Ganpati Visarjan : महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत गणेशोत्सवाचा मोठा उत्साह असतो…घरा-घरात गणपती पाहायला मिळतात…तर गल्ल्यांमध्ये मोठ्या सार्वजनिक मोठं-मोठ्या बाप्पााच्या मूर्त्या पाहायला मिळतात…मुंबईतील लाल-बाग राजाची तर विदेशातही चर्चा असते…सेलिब्रिटीसह दिग्गज लोक या ठिकाणी दर्शनाला येतात…तसंच पुण्यातील दगडूशेठ गणपतीसह इतर गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी पाहायला मिळते..
आपण बाप्पाची एवढ्या आनंदाने स्थापना करतो, 11 दिवस घरात बसवतो आणि बाराव्या दिवशी काळजावर दगड ठेवून विसर्जन करावं लागतं…पण असं का? आपण बाप्पाचं विसर्जन का करतो? बाप्पााला आपण घरातच बसून ठेवू शकत नाही का? जर घरात बसून ठेवू शकतो, तर काय करावं लागतं?
गणपती बाप्पाचे विसर्जन का केले जाते? ( Ganpati Visarjan )
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाने होते… ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो…अनेक जण भावूक होऊन रडताना दिसतात… मात्र अनेकांच्या मनात एक भावनिक प्रश्न नक्कीच उभा राहतो की, ज्या बाप्पाला आपण एवढ्या प्रेमाने आणि उत्साहाने घरात आणतो, त्यांची 11 दिवस सेवा करतो, त्यांना अवघ्या काही दिवसांत पाण्यात का नेऊन विसर्जन केले जाते? बाप्पाची ही सुंदर मूर्ती आपण कायमची आपल्या घरात का बसवून ठेवू शकत नाही? तर या मागे काही कारणं आहेत….
हिंदू धर्मशास्त्रानुसार, आपण गणेशोत्सवासाठी जी मूर्ती घरी आणतो, तिला ‘उत्सव मूर्ती’ किंवा ‘पार्थिव गणपती’ म्हटले जाते. पार्थिव म्हणजे मातीपासून तयार झालेली मूर्ती… गणेश चतुर्थीच्या दिवशी या मूर्तीमध्ये मंत्रोच्चारांद्वारे आणि विशिष्ट विधींद्वारे देवतेच्या दैवी शक्तीचे आवाहन केले जाते, ज्याला आपण प्राणप्रतिष्ठा असे म्हणतो… शास्त्र असे सांगते की, अशा प्रकारे मातीच्या मूर्तीमध्ये आवाहन केलेल्या ऊर्जेला आणि शक्तीला एका विशिष्ट कालावधीची मर्यादा असते… उत्सवाचे हे दिवस म्हणजे बाप्पा आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले असतात… ज्याप्रमाणे एखादा प्रिय पाहुणा आपल्या घरी येतो, आपण त्याचे आदरातिथ्य करतो आणि नंतर त्याला निरोप देतो, त्याचप्रमाणे बाप्पाचीही ठराविक दिवस सेवा करून त्यांना त्यांच्या मूळ स्थानी जाण्यासाठी निरोप दिला जातो, असं म्हटलं जातं… जर आपण ती मूर्ती तशीच घरात ठेवून दिली, तर त्यातील प्राणप्रतिष्ठेची ऊर्जा हळूहळू क्षीण होऊ लागते, जे धार्मिक दृष्ट्या योग्य मानले जात नाही.
हेही वाचा : हि शान कुणाची? लालबागच्या राजाची! पहा, लाखो भक्तांचा जयघोष; राजाची भव्य विसर्जन
बाप्पाला घरात कायमस्वरूपी ठेवता येत नाही का? ( Ganpati Visarjan Reason )
मग व्यावहारिक पातळीवर आपण बाप्पाला घरातच का ठेवून घेऊ शकत नाही? याचे उत्तर आपल्या दैनंदिन जीवनशैलीत आहे. गणेशोत्सवातील मूर्ती या ‘उत्सव मूर्ती’ किंवा ‘पार्थिव गणपती’ असतात. या काळात त्यांच्या पूजेचे नियम अत्यंत कडक असतात… दररोज सकाळ-संध्याकाळी आरती, नैवेद्य, आणि घरामध्ये पूर्ण पवित्रता पाळणे आवश्यक असते… आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात सामान्य माणसाला वर्षभर रोज तितक्याच कडक नियमांचे पालन करणे शक्य होत नाही… पूजेमध्ये काही त्रुटी राहिल्यास मनात नकारात्मकता येऊ नये, म्हणून उत्सवानंतर तिचे विसर्जन केले जाते… तसेच, हवेतील दमटपणामुळे मोठ्या मातीच्या मूर्तीला तडे जाण्याची भीती असते, जे धार्मिक दृष्ट्या अशुभ मानले जाते…
पण बाप्पाला पाण्यातचं का विसर्जित केलं जातं, असा प्रश्न अनेकांना पडतो….पौराणिक इतिहासानुसार, जेव्हा महर्षी वेदव्यास यांना ‘महाभारत’ हे महाकाव्य लिहायचे होते, तेव्हा त्यांनी बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पाला ते लिहून देण्याची विनंती केली. बाप्पाने ही विनंती मान्य केली, पण व्यासांसमोर एक कडक अट ठेवली. बाप्पा म्हणाले, “मी एकदा लिहायला सुरुवात केल्यावर माझी लेखणी थांबणार नाही. तुम्ही न थांबता श्लोक सांगावे लागतील.” वेदव्यासांनी ही अट स्वीकारली आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी महाभारताच्या महालेखनाला सुरुवात झाली… बाप्पाने सलग 10 दिवस अहोरात्र, न थांबता आणि पाणीही न पिता अत्यंत वेगाने ते महाकाव्य लिहून काढले.
वेदव्यास आणि गणपतीच्या महाभारत लेखनाची कथा ( ganpati history )
सलग 10 दिवस चाललेल्या या अखंड आणि अतिवेगाच्या लेखनामुळे बाप्पाच्या शरीरात प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आणि त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले.. त्यांचे अंग उष्णतेने धगधगू लागले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा महाभारताचे लेखन पूर्ण झाले, तेव्हा वेदव्यासांनी बाप्पाला स्पर्श केला आणि त्यांना बाप्पाच्या शरीराचा हा दाह जाणवला… त्यांचे तापमान कमी करण्यासाठी वेदव्यासांनी आधी त्यांच्या अंगाला सुगंधी मातीचा लेप लावला… परंतु, माती सुकल्यावर बाप्पाचे शरीर आखडू लागले… अखेर, बाप्पाच्या शरीराला थंडावा देण्यासाठी आणि त्यांचे अंग शांत करण्यासाठी महर्षी वेदव्यासांनी त्यांना जवळच असलेल्या पवित्र आणि शीतल पाण्याच्या सरोवरात नेऊन स्नान घातले.. पाण्यात जाताच बाप्पाच्या शरीराची उष्णता शांत झाली… हीच आठवण म्हणून दरवर्षी १० दिवस बाप्पाची सेवा करून ११ व्या दिवशी त्यांना शीतल जलात विसर्जित करण्याची परंपरा सुरू झाली, असं म्हटलं जातं…
पण बाप्पाला जर घरात ठेवायचं असेल तर काय करावं लागतं.. तर त्यासाठी शास्त्रात वेगळा मार्ग आहे… घरातील देव्हाऱ्यात आपण जी गणपतीची मूर्ती ठेवतो, ती कधीही विसर्जित केली जात नाही… ही मूर्ती सोने, चांदी, पितळ, तांबे किंवा स्फटिक अशा धातूंची असते, ज्यांची ऊर्जा स्थिर असते आणि तिचे नियम उत्सवमूर्ती इतके कडक नसतात…त्यामुळे तुम्ही सोन्या-चांदीची मुर्ती बनवून घरात ठेवू शकता….








