Karveer Cha Raja Ganpati : अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली असतानाच गोखले कॉलेज चौकात धक्कादायक घटना घडली. वाय. पी. पोवार नगर मंडळाची तब्बल 21 फुटी ‘करवीरचा राजा’ गणेशमूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात असताना अचानक कोसळली.
कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत धक्कादायक घटना
ही मूर्ती बॅलेंसिंग प्रकारातील होती. एका पायावर उभी असलेली आणि पुढील बाजूला काहीशी झुकलेली ही भव्य मूर्ती ट्रॅक्टर ट्रॉलीतून विसर्जन मिरवणुकीत नेली जात होती. गोखले कॉलेज चौकाजवळ आल्यानंतर मूर्तीचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर काही क्षणांतच मूर्तीचा तोल गेला आणि ती रस्त्यावर कोसळली.
मूर्ती कोसळताच मिरवणुकीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मंडळाच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने मूर्ती रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
हेही वाचा : बाप्पाचे विसर्जन का केले जाते? घरात बसवून ठेवू शकत नाही का?
विद्युत तारेला स्पर्श झाल्यानंतर मूर्तीचा तोल गेला ( Karveer Cha Raja Ganpati )
विसर्जन मार्गावर असलेल्या विद्युत तारा आणि इतर अडथळ्यांमुळे मोठ्या मूर्तींच्या मिरवणुकीसमोर आव्हान निर्माण होत असल्याचे या घटनेनंतर पुन्हा समोर आले आहे. मंडळाकडून विद्युत तारांबाबत आधीच संबंधित यंत्रणेला कळवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे; मात्र महावितरणने हा आरोप फेटाळल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, ‘करवीरचा राजा’ ( Karveercha Raja) ची ही घटना सोशल मीडियावर आणि गणेशभक्तांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. विसर्जन मिरवणुकीत मोठ्या मूर्ती नेताना मार्गावरील विद्युत तारा, झाडांच्या फांद्या, रस्त्याची स्थिती आणि इतर अडथळ्यांची पूर्वतयारी किती महत्त्वाची आहे, याकडेही या घटनेने लक्ष वेधले आहे.









