Gokul Election Result 2026: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शाहू शेतकरी विकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत दूध उत्पादक, ठरावधारक आणि शेतकऱ्यांचे आभार मानले. तसेच त्याच्या विजयामागचं कारण सांगत नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या
Gokul Election Result 2026 : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळाल्यानंतर आता सत्तेच्या नव्या पर्वाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी पॅनेलने महायुतीच्या पॅनेलला पराभूत करत १३ जागांवर विजय मिळवला. या विजयानंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत दूध उत्पादकांचे (Gokul Milk Union) आभार मानले, फेरमतमोजणीच्या मागणीवर भूमिका स्पष्ट केली आणि गोकुळच्या आगामी कारभाराचा (Gokul Election News) अजेंडाही मांडला. ‘गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता आहे. संस्थेचे निर्णय कोल्हापुरातच झाले पाहिजेत,’ असे ठामपणे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
गोकुळच्या विजयामागे दूध उत्पादकांचा कौल; सतेज पाटील म्हणाले…
गोकुळच्या निवडणुकीत जिल्ह्यातील दूध उत्पादक आणि ठरावधारकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सतेज पाटील यांनी आभार व्यक्त केले. साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकरी आणि ठरावधारकांनी दिलेला कौल हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून, गोकुळचा कारभार कसा असावा याबाबत जनतेने व्यक्त केलेली अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
दूध उत्पादक आणि ठरावधारकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही गोकुळमध्ये एकमुखी कारभार हवा होता. मतदारांनी त्याच भूमिकेला समर्थन दिले आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: दसऱ्याला उपवास कधी सोडावा? पारणाची योग्य वेळ आणि महत्त्वाचे नियम जाणून घ्या!
९८ अवैध मतांवरून सतेज पाटलांचा मोठा दावा; म्हणाले, ‘आणखी उमेदवार निवडून आले असते!’
गोकुळच्या निकालानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील तब्बल ९८ अवैध मतांचा मुद्दा यावेळी चर्चेत आला. या मतांपैकी २० मतपत्रिकांवर शिट्टी चिन्हावर शिक्का मारलेला होता; मात्र अन्य ठिकाणीही शिक्का लागल्याने ती मते बाद झाली, असे सतेज पाटील यांनी सांगितले.
तसेच ही मते बाद झाली नसती, तर आपल्या पॅनेलचे तसे आणखी ५ ते ८ उमेदवार निवडून आले असते, असा दावा सतेज पाटलांनी केला. मतदारांचा कौल आपल्या बाजूने होता, हे या निकालातून स्पष्ट झाल्याचेही पाटील म्हणाले.
फेरमतमोजणीचा अर्ज फेटाळला; निकालानंतर तीन तासांचा संघर्ष
निवडणुकीतील पराभवानंतर फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज फेटाळल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
मतमोजणीदरम्यान अवैध मते आधीच बाजूला काढण्यात आली होती. दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनीही या मतपत्रिकांची तपासणी केली होती. त्यामुळे फेरमतमोजणीसाठी कायदेशीरदृष्ट्या योग्य कारण नसल्याने अर्ज फेटाळण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पराभव झालेल्यांनी तो खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा होता, असे सांगत पाटील यांनी फेरमतमोजणीच्या मागणीवर नाराजी व्यक्त केली. या प्रक्रियेत सुमारे तीन तास गेले, असेही त्यांनी नमूद केले.
‘गोकुळचे निर्णय मुंबईत नव्हे, कोल्हापुरातच झाले पाहिजेत!’
गोकुळच्या निवडणुकीतील सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संस्थेच्या कारभारावर आणि निर्णयप्रक्रियेवर कोणाचा प्रभाव राहणार, हा होता. याच मुद्द्यावर सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडली.
गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता (Kolhapur Politics) आहे. त्यामुळे संस्थेचे महत्त्वाचे निर्णय कोल्हापुरातच झाले पाहिजेत. गोकुळची मालकी दूध उत्पादकांची राहिली पाहिजे, ही भूमिका मतदारांना पटली आणि त्यांनी मतदानातून आपला निर्णय दिला, असे पाटील म्हणाले.
महायुतीतील नेत्यांवर निशाणा; ‘पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा होता’
फेरमतमोजणीच्या अर्जावरून सतेज पाटील यांनी महायुतीतील नेत्यांनाही लक्ष्य केले. मुश्रीफ साहेब आणि चंद्रदीप नरके यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज करणे टाळायला हवे होते, असे ते म्हणाले.
एका बाजूला पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे फेरमतमोजणीसाठी अर्ज करायचा, ही भूमिका विसंगत असल्याचे पाटील यांनी नमूद केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज आल्यानंतर त्यावर निर्णय घेणे आवश्यक होते. त्यामुळे या प्रक्रियेवर अधिक भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शपथा आणि राजकीय दाव्यांना निकालातून उत्तर?
निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय वक्तव्यांचा संदर्भ देत सतेज पाटील यांनी विरोधकांवर टीका केली. पुरोगामी महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात सत्तेतील लोकांकडून अशा प्रकारचे राजकारण होणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. मतदारांनी दिलेला निकाल ही त्याला चपराक असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांनाही कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने मतदानातून उत्तर दिल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचा दौरा अधिकृत शासकीय स्वरूपाचा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
साडेपाच लाख दूध उत्पादक केंद्रस्थानी; आगामी कारभाराची दिशा ठरली
निवडणूक संपल्यानंतर आता दूध उत्पादकांना न्याय देणे हेच प्राधान्य असेल, असे सतेज पाटील यांनी सांगितले. गोकुळशी संबंधित सुमारे साडेपाच हजार दूध संकलन केंद्रांकडे सत्ताधारी गटाचीच केंद्रे असल्याच्या भावनेतून नव्हे, तर सर्वांना समान न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून संचालक मंडळ काम करेल. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून मिळालेल्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न असेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
आता गोकुळच्या कारभाराकडे लक्ष
गोकुळच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सतेज पाटील यांनी राजकीय आरोप-प्रत्यारोपांबरोबरच आगामी कारभाराची दिशाही स्पष्ट केली आहे. दूध उत्पादकांचे हित, संस्थेच्या निर्णयांमध्ये कोल्हापूरचे महत्त्व आणि सर्व संकलन केंद्रांना समान न्याय या मुद्द्यांवर नव्या संचालक मंडळाची कामगिरी कशी राहते, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









