• Home
  • ताज्या बातम्या
  • कोंढापुरी खूनप्रकरणाचा १२ तासांत उलगडा; एक आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
गुन्हा

कोंढापुरी खूनप्रकरणाचा १२ तासांत उलगडा; एक आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

Kondhapuri Murder Case
24

सचिन धुमाळ | शिरूर प्रतिनिधी 

Kondhapuri Murder Case : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे झालेल्या २४ वर्षीय महेंद्र सकट याच्या निर्घृण खूनप्रकरणाचा शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी प्रथमेश नानासाहेब राऊत (रा. फंडवस्ती, रांजणगाव गणपती, मूळ रा. ढोकसांगवी, ता. शिरूर) याला अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीन मुलांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

खंडोबा मंदिर परिसरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह (Kondhapuri Murder Case)

शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंढापुरी गावात २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खंडोबा मंदिरासमोरील तलावाच्या कडेला एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा दिसून आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली. तपासादरम्यान मृत तरुणाचे नाव महेंद्र लव सकट (वय २४, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

मैत्रीतील वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज (Mahendra Saket Murder)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण, संशयित आरोपी आणि दोन अल्पवयीन एकमेकांच्या ओळखीचे होते. कोणासोबत फिरायचे आणि कोणाशी बोलायचे, या कारणावरून मृत तरुण आणि अल्पवयीन मुलांमध्ये वाद होता. याच वादातून खुनाचा कट रचल्याचा प्राथमिक तपासात संशय आहे.
मृत महेंद्र सकट (Mahendra Saket) याला गांजा पिण्याचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे दोन चाकूंनी त्याच्या शरीरावर १८ ते २० वेळा वार करून त्याचा खून केल्याची माहिती संशयितांनी चौकशीदरम्यान दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : बिश्नोई अस्तित्त्वात नाही अमित शहाच लॉरेन्स बिश्नोई आहेत? संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपींचा माग

खुनाच्या घटनेनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता, रांजणगाव परिसरातील तिघे संशयित या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
संशयित अहिल्यानगर जिल्ह्यात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांचे पथक श्रीरामपूर तालुक्यात रवाना झाले. तेथील बेलापूर बायपास परिसरातून तिघांना शोधून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत प्रथमेश नानासाहेब राऊत आणि दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रथमेश राऊत याला अटक करण्यात आली असून, दोन्ही अल्पवयीन मुलांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जिनेश कोळी, अंकुश कारंडे, पोलीस हवालदार अमोल दांडगे, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, अमोल चव्हाण तसेच पोलीस कॉन्स्टेबल राम जाधव, नारायण वाळके आणि मच्छिंद्र निचित यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी, पोलीस हवालदार नितीन सुद्रिक आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल गडदे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts