Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • NVIDIA वादात मोठा ट्विस्ट! जेनसन हुआंग यांच्या मुलीने अचानक का रद्द केला दक्षिण कोरिया दौरा?
देश

NVIDIA वादात मोठा ट्विस्ट! जेनसन हुआंग यांच्या मुलीने अचानक का रद्द केला दक्षिण कोरिया दौरा?

NVIDIA News | Jensen Huang
7

NVIDIA News: अमेरिकेतील आघाडीची AI चिपनिर्मिती कंपनी NVIDIA सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कंपनीचे CEO जेनसन हुआंग यांच्याशी संबंधित अ‍ॅलिस हुआंग प्रकरणामुळे जागतिक टेक उद्योगात खळबळ उडाली आहे. या दरम्यान जेनसन हुआंग यांची मुलगी आणि NVIDIA मधील वरिष्ठ अधिकारी मॅडिसन हुआंग हिने दक्षिण कोरियाचा नियोजित दौरा अचानक रद्द केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा आणखी वाढली आहे.

कोण आहेत अ‍ॅलिस हुआंग? NVIDIA प्रकरण नेमके काय? (NVIDIA News)

अ‍ॅलिस हुआंग (Alice Huang) या सिंगापूरस्थित Megaspeed International या कंपनीशी संबंधित माजी वरिष्ठ अधिकारी असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेतील काही गुप्तचर यंत्रणांना त्यांचे चीनशी संबंधित कथित संबंध आणि माहिती मिळवण्याच्या प्रयत्नांबाबत संशय असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी वृत्त दिले आहे.

माध्यमांतील अहवालांनुसार, जेनसन हुआंग (Jensen Huang) आणि अ‍ॅलिस हुआंग यांच्यात जवळचे वैयक्तिक संबंध होते. जेनसन हुआंग यांनी NVIDIA कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात पत्नीशी प्रामाणिक न राहिल्याची कबुली देत कुटुंबीयांची आणि सहकाऱ्यांची माफी मागितली. मात्र, त्यांनी त्या संदेशात अ‍ॅलिस हुआंग यांचे नाव घेतलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे, अ‍ॅलिस हुआंग या जेनसन हुआंग यांच्या नातेवाईक नाहीत.

चीनला NVIDIA च्या चिप्स पोहोचल्याचा आरोप

या प्रकरणात सर्वाधिक गंभीर चर्चा NVIDIA च्या चिप्सच्या पुरवठ्याबाबत सुरू आहे. अमेरिकेच्या निर्यात निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅलिस हुआंग आणि त्यांच्याशी संबंधित व्यावसायिक नेटवर्कच्या माध्यमातून चीनमध्ये NVIDIA च्या प्रगत चिप्स पोहोचल्याचा आरोप एका अहवालात करण्यात आला आहे.

The Information च्या वृत्तानुसार, सुमारे 7.5 अब्ज डॉलर किमतीच्या चिप्सच्या पुरवठ्याशी हे नेटवर्क संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये H100, H200 आणि A100 या चिप्सचा समावेश असल्याचे सांगितले जाते. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे संपूर्ण पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या आरोपांना सिद्ध झालेले तथ्य मानता येणार नाही.

हेही वाचा : IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये; अर्शदीप सिंह मुंबईच्या ताफ्यात

जेनसन हुआंग यांची मुलगी मॅडिसन हुआंगचा दक्षिण कोरिया दौरा रद्द

या वादादरम्यान जेनसन हुआंग ((Jensen Huang) यांची मुलगी मॅडिसन हुआंग हिने दक्षिण कोरियाचा नियोजित दौरा रद्द केला. ती NVIDIA मध्ये वरिष्ठ संचालक पदावर कार्यरत आहे. मॅडिसन हिने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या NVIDIA AI Day Seoul 2026 कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे नियोजन केले होते. तसेच दक्षिण कोरियातील सरकारी अधिकारी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधींशी तिच्या भेटी होणार होत्या.

मात्र, कौटुंबिक कारणांमुळे तिचा दौरा रद्द झाल्याचे वृत्त Yonhap या वृत्तसंस्थेने दिले. हा निर्णय वडिलांशी संबंधित वादामुळे घेतला का, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. मॅडिसनच्या अनुपस्थितीतही NVIDIA चा कार्यक्रम नियोजनानुसार पार पडणार असल्याचे वृत्त आहे.

NVIDIA च्या संचालक मंडळाकडून स्वतंत्र चौकशी

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत NVIDIA च्या संचालक मंडळाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. या तपासात कंपनीची गोपनीय माहिती किंवा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती धोक्यात आली आहे का, याचीही तपासणी केली जाणार आहे.

कंपनीने उपलब्ध माहितीनुसार राष्ट्रीय सुरक्षा किंवा कंपनीची गुपिते धोक्यात आल्याचे मानण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. जेनसन हुआंग यांनीही या चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

NVIDIA च्या शेअर्सवर परिणाम

या वादाचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला आहे. Reuters च्या वृत्तानुसार, दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये NVIDIA चे बाजारमूल्य सुमारे 430 अब्ज डॉलरने कमी झाले. कंपनीच्या व्यवसायातील पारदर्शकता, चीनला होणारा चिप पुरवठा आणि CEO यांच्या नेतृत्वाबाबत गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

NVIDIA च्या चौकशीतून काय निष्पन्न होते, चीनला चिप्स पुरवल्याच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे आणि कंपनीच्या नेतृत्वावर याचा काय परिणाम होतो, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts