Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुण्याचे नाव बदलणार? ‘फुलेनगर’ करण्याची जोरदार मागणी; महात्मा फुलेंना भारतरत्न द्या!
Pune

पुण्याचे नाव बदलणार? ‘फुलेनगर’ करण्याची जोरदार मागणी; महात्मा फुलेंना भारतरत्न द्या!

Pune Name Change
24

Pune Name Change : महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या पुणे शहराच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुणे शहराचे नाव बदलून ‘महात्मा ज्योतिबा फुलेनगर’ (Mahatma Phule Nagar) करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार मरणोत्तर प्रदान करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी पुढे आली आहे. राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या शिष्टमंडळाने नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये पुण्याचे नामकरण ‘महात्मा ज्योतिबा फुलेनगर’ करण्यासाठी राज्य सरकारने अधिकृत प्रस्ताव आणि ठराव मंजूर करावा, अशी भूमिका मांडण्यात आली.

पुण्याला फुलेनगर नाव देण्याची मागणी का? (Pune Name Change)

महात्मा ज्योतिराव फुले (Mahatma Jyotiba Phule) यांनी पुण्यातून स्त्रीशिक्षण, सामाजिक समता आणि वंचितांच्या हक्कांसाठी मोठे कार्य केले. सावित्रीबाई फुले यांच्या साथीने त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करून समाजातील रूढी-परंपरांना आव्हान दिले. शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत पुणे हे त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे केंद्र राहिले.

त्यामुळे ज्या शहरातून महात्मा फुले यांनी सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली, त्या पुणे शहराला त्यांचे नाव देणे ही त्यांच्या कार्याला दिलेली ऐतिहासिक आदरांजली ठरेल, अशी भूमिका मागणी करणाऱ्या संघटनेने मांडली आहे.

महात्मा फुलेंना भारतरत्न देण्याचीही मागणी (Mahatma Phule Nagar)

पुण्याचे नामकरण करण्याबरोबरच महात्मा ज्योतिराव फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

महात्मा फुले यांनी स्त्रीशिक्षण, शेतकरी, बहुजन समाज आणि सामाजिक समतेसाठी केलेले कार्य देशाच्या इतिहासात महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या योगदानाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे.

हेही वाचा : IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये; अर्शदीप सिंह मुंबईच्या ताफ्यात

सरकारकडे आणखी कोणत्या मागण्या?

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी इतरही मागण्या केल्या आहेत.

  • महात्मा फुले यांच्या कार्यावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करावे.
  • ११ एप्रिल २०२७ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विशेष आमसभा आयोजित करावी.
  • प्रागतिक आणि प्रबोधनात्मक कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींसाठी ‘सत्यशोधक भूषण’ पुरस्कार सुरू करावा.
  • राज्यातील विद्यापीठांमध्ये महात्मा फुले अध्यासन सुरू करावे.
  • महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत उपलब्ध करून द्यावे.

मुख्यमंत्र्यांकडून मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन

या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी आयोजनासाठी शासनाने समिती स्थापन केल्याची माहिती दिली. तसेच मोर्चाने मांडलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, पुण्याचे नाव ‘महात्मा ज्योतिबा फुलेनगर’ करण्याची मागणी पुढे आल्याने शहराच्या नामकरणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय किंवा अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे पुण्याचे नाव बदलणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts