१९ नोव्हेंबर रोजी मुंबई विमानतळावर धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी सहा तास विमानसेवा बंद राहणार आहे.
या कालावधीत विमानांचे उड्डाण आणि लँडिंग प्रभावित होण्याची शक्यता आहे.
प्रवाशांनी विमान कंपनीकडून फ्लाइट स्टेटस तपासावे आणि विमानतळावर जाण्यापूर्वी वेळापत्रकाची खात्री करावी.
Mumbai Airport Flight Update : १९ नोव्हेंबर रोजी मुंबई विमानतळावर सहा तास विमानसेवा बंद राहणार आहे. धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे उड्डाणे प्रभावित होणार असून प्रवाशांनी विमानाचे वेळापत्रक तपासण्यासह कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सहा तास विमानसेवा तात्पुरती बंद राहणार आहे. विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्यांवर वार्षिक देखभाल आणि तांत्रिक तपासणी केली जाणार असल्याने सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होणार नाही. या निर्णयामुळे या वेळेत प्रवासाचे नियोजन केलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Aircraft Takeoff and Landig)
मुंबई विमानतळावरील विमानसेवा का बंद राहणार?
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या (MIAL) माहितीनुसार, पावसाळ्यानंतरच्या नियमित देखभाल कार्यक्रमांतर्गत दोन्ही धावपट्ट्यांची तपासणी आणि दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये धावपट्टीच्या पृष्ठभागाची पाहणी, आवश्यक दुरुस्ती तसेच रनवेवरील दिवे, खुणा आणि पाणी निचरा व्यवस्थेची तांत्रिक तपासणी केली जाईल. मुंबई विमानतळाच्या दोन्ही क्रॉस रनवेवर ही कामे होणार आहेत. त्यामुळे १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या सहा तासांच्या कालावधीत विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग बंद राहील. ही नियमित देखभाल विमानतळाची सुरक्षितता आणि कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी केली जात आहे. (Air Service closed)
हेही वाचा : Fly-91 चा मोठा निर्णय; 20 जूनपासून सोलापूरहून दोन मार्गांवरील विमानसेवा बंद
कोणत्या विमानसेवांवर होणार परिणाम?
मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार असल्याने या वेळेत नियोजित असलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या आगमन व प्रस्थान वेळापत्रकात बदल होऊ शकतो. काही विमानांच्या वेळा बदलल्या जाऊ शकतात, तर काही उड्डाणांचे पुनर्नियोजन होण्याची शक्यता आहे. मात्र, याचा अर्थ १९ नोव्हेंबर रोजी दिवसभर विमानसेवा बंद राहणार असा नाही. नियोजित बंद कालावधी सकाळी ११ ते सायंकाळी ५ असा आहे. या वेळेपूर्वी किंवा नंतरच्या विमानांसाठीही प्रवाशांनी एअरलाइनकडून अद्ययावत वेळापत्रक तपासणे महत्त्वाचे आहे. (Impact on airline services)
प्रवाशांनी कोणती काळजी घ्यावी?
१. फ्लाइटचे वेळापत्रक तपासा : १९ नोव्हेंबर रोजी प्रवास असल्यास एअरलाइनच्या वेबसाइट किंवा अॅपवरून उड्डाणाची अद्ययावत वेळ तपासा.
२. एअरलाइनचे मेसेज आणि ई-मेल पाहा : विमानाच्या वेळेत बदल, विलंब किंवा रद्द होण्याबाबत कंपनीकडून सूचना येऊ शकतात. त्यामुळे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ई-मेल तपासत राहा.
३. विमानतळावर निघण्यापूर्वी खात्री करा : जुन्या तिकिटावरील वेळ गृहीत धरून घरातून निघू नका. प्रवासाच्या दिवशी पुन्हा फ्लाइट स्टेटस तपासा.
४. कनेक्टिंग फ्लाइट असल्यास विशेष काळजी घ्या : मुंबईमार्गे दुसऱ्या शहरात किंवा परदेशात जाणार असाल, तर पुढील विमानाच्या वेळेवर परिणाम होतो का, याची एअरलाइनशी खात्री करा.
५. पर्यायी प्रवासाचे नियोजन ठेवा : महत्त्वाची बैठक, कार्यक्रम किंवा पुढील प्रवासाचे आरक्षण असल्यास संभाव्य विलंब लक्षात घेऊन वेळेचे नियोजन करा.
६. तिकीट बदलण्यापूर्वी एअरलाइनशी संपर्क साधा : विमानाच्या वेळेत बदल झाल्यास तिकीट पुनर्नियोजन, रद्द करणे किंवा परताव्याबाबत संबंधित एअरलाइनचे नियम तपासा.
(Travelers Flights Info )
विमानतळ प्रशासनाकडून आधीच नियोजन
विमानतळ प्रशासनाने या देखभाल कामाबाबत एअरलाइन कंपन्या आणि संबंधित यंत्रणांना आधीच कळवले आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना आपल्या वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यासाठी आणि प्रवाशांना माहिती देण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. प्रवाशांनीही शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी प्रवासापूर्वी विमानाची स्थिती तपासावी. (Airport Arrangement)









