सचिन धुमाळ । शिरूर प्रतिनिधी
Shirur Ganja Seized: पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल अडीचशे किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत महिंद्रा XUV 700 कारसह दोन आरोपींना ताब्यात (250 Kg Ganja Seized) घेण्यात आले असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ कोटी ५२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये नमूद आहे. मात्र, या मोठ्या कारवाईनंतर पुणे शहर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या स्वतंत्र प्रेस नोटमधील घटनाक्रम आणि आकडेवारीत महत्त्वपूर्ण तफावत समोर आली आहे.
शिरूरमध्ये अडीचशे किलो गांजा जप्त (Shirur Ganja Seized)
पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक दोनचे पोलीस निरीक्षक जीवन माने हे २५ नोव्हेंबर रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना कुंजीर लॉन्स परिसरात त्यांना पांढऱ्या रंगाची महिंद्रा XUV 700 संशयास्पदरीत्या भरधाव वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने गाडी न थांबवता सोलापूरच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी यवत पोलिसांची मदत घेत वाहनाचा पाठलाग सुरू केला. पुढे वाहन शिरूरच्या दिशेने गेल्याने पुणे ग्रामीण नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. अखेर शिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनी येथील सत्यभामा निवास इमारतीसमोरील मोकळ्या जागेत दोघांना ताब्यात घेतल्याचे पुणे शहर पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे.
दुसरीकडे, पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये याच कारवाईचा घटनाक्रम वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. त्यानुसार, २६ नोव्हेंबर रोजी पहाटे १.१० वाजता पोलीस निरीक्षक जीवन माने यांना ओडिशातून गांजा घेऊन हैदराबाद-सोलापूर मार्गे पुण्याकडे येणाऱ्या महिंद्रा XUV 700 कारची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे-सोलापूर महामार्गावर सापळा रचण्यात आला. कार कुरकुंभ, दौंड आणि काष्टीमार्गे शिरूरकडे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दौंड पोलिसांना नाकाबंदी करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर शिरूर पोलिसांनी न्हावरा जंक्शन, पुणे-नगर रोड आणि गोलेगाव रोडवरील सुंदर सृष्टी अपार्टमेंटजवळ तीन ठिकाणी नाकाबंदी केली. पहाटे तीन वाजता कार दिसल्यानंतर पाठलाग करून ३.१५ वाजता दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा : पुण्यात न्यायालयाबाहेर गोळीबाराने खळबळ! एकाचा मृत्यू, एक जखमी; घटनास्थळी दोन पिस्तूल आढळले
महिंद्रा XUV 700 मधून गांजाची वाहतूक
पोलिसांनी कारची झडती घेतली असता २२ गोण्यांमध्ये भरलेला २३५ किलो ३९० ग्रॅम गांजा, महिंद्रा XUV 700 कार आणि सॅमसंग व ओप्पो कंपनीचे दोन मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ५२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (250 Kg Ganja Seized) केल्याचे ग्रामीण पोलिसांनी म्हटले आहे. तर पुणे शहर पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये २५० किलो गांजा आणि एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे नमूद आहे.
या दोन्ही प्रेस नोटमध्ये आरोपींची नावे समीर पुरुषोत्तम राऊत (वय २४, रा. सांगोलवाडा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) आणि अजय जगदीश मोहिते (वय ३०, रा. बागापूर, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) अशी समान आहेत. वाहन आणि अटकेचे ठिकाणही समान असताना गांजाच्या वजनात तब्बल १४ किलो ६१० ग्रॅमचा फरक आहे. तसेच मुद्देमालाच्या एकूण किमतीतही १ लाख ७० हजार रुपयांची तफावत दिसून येते.
**एकाच कारवाईचा घटनाक्रम दोन वेगवेगळ्या पद्धतीने!**
पुणे शहर पोलिसांच्या प्रेस नोटनुसार कारवाईची सुरुवात लोणी काळभोर येथील नियमित पेट्रोलिंगदरम्यान संशयित वाहन दिसल्याने झाली, तर पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रेस नोटनुसार ओडिशातून गांजा येणार असल्याच्या गोपनीय माहितीवरून सापळा रचण्यात आला होता. याशिवाय पाठलाग, नाकाबंदी आणि कारवाईची वेळ याबाबतही दोन्ही प्रसिद्धी पत्रकात वेगवेगळे तपशील आहेत.
त्यामुळे ही कारवाई नेमकी कोणत्या माहितीच्या आधारे सुरू झाली, पाठलागाचा सलग घटनाक्रम काय होता आणि गांजाचे अधिकृत वजन व मुद्देमालाची अंतिम किंमत किती, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी स्वतः पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या दोन प्रेस नोटमधील या तफावतीबाबत अधिकृत स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे.
एकीकडे अडीचशे किलो गांजाची मोठी कारवाई, तर दुसरीकडे त्याच कारवाईच्या घटनाक्रमाबाबत दोन पोलीस यंत्रणांच्या निवेदनांत तफावत; त्यामुळे या प्रकरणाची चर्चा आता केवळ गांजा जप्तीपुरती मर्यादित राहिलेली नाही.









