Fawad Khan Web Series: अभिनेता फवाद खान मुख्य भूमिकेत असलेल्या ‘जो बचे है संग समेट लो’ (Jo Bache Hain Sang Samet Lo) या वेब सीरिजच्या प्रदर्शनावरून सध्या मोठा वाद पेटला आहे. ही सीरिज येत्या ४ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित (Jo Bache Hain Sang Samet Lo Release Date) होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र त्याआधीच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला कडक भूमिका घेत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पाकिस्तानात तयार झालेला कोणताही मजकूर भारतात दाखवला जाणार नाही, याची खात्री करावी, असे मंत्रालयाने ठणकावून सांगितले आहे.
मंत्रालयाचा दणका आणि जुना आदेश (Fawad Khan Web Series)
मिळालेल्या माहितीनुसार, या वेब सीरिजच्या प्रदर्शनाविरोधात अनेक तक्रारी आणि निवेदने आल्यानंतर सरकारने आपली भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे. ८ मे २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश नेटफ्लिक्सला देण्यात आले आहेत. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतातील ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेदरम्यान मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी कडक नियम लागू केले होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानात निर्मित कोणताही चित्रपट, वेब सीरिज, गाणे किंवा पॉडकास्ट भारतात उपलब्ध करून देऊ नये, असे त्या वेळी स्पष्ट करण्यात आले होते. जून २०२५ मध्ये नेटफ्लिक्सनेही भारतात पाकिस्तानी आशय दाखवणार नसल्याचे कळवले होते; आता सरकारने नेटफ्लिक्सला त्याच भूमिकेवर कायम राहण्यास सांगितले आहे.
सिने संघटनांचा विरोध आणि पंतप्रधानांकडे मागणी
पाकिस्तानमधून निर्मित झालेली ही नेटफ्लिक्सची पहिलीच मूळ मालिका असल्याची चर्चा आहे. मात्र, ट्रेलर समोर आल्यानंतर ‘ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन’ (AICWA) आणि ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ (FWICE) या संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. या दोन्ही संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून या वेब सीरिजवर भारतात बंदी घालण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानी कलाकार किंवा संस्थांशी कोणतेही व्यावसायिक व सर्जनशील संबंध ठेवू नयेत, अशी भूमिका FWICE ने पुन्हा मांडली असून, व्यावसायिक फायद्यांपेक्षा राष्ट्रीय हित महत्त्वाचे असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
हेही वाचा : अमृता खानविलकरच्या ‘अमुल्य बाय अमृता’ ब्रँडची फोर्ब्स इंडियाकडून दखल!
पाकिस्तानकडून टीका
दुसरीकडे, या वादावर पाकिस्तानचे मंत्री एहसान इक्बाल यांनी प्रतिक्रिया देत भारतावर टीका केली आहे. ‘ सुरुवातीला क्रीडा प्रकाराचा शस्त्राप्रमाणे वापर केला, त्यानंतर पाण्याचा आणि आता कलेचा शस्त्र म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियाद्वारे केला असून, कलाकारांना काम करू द्यावे आणि काय पाहायचे हे प्रेक्षकांवर सोडावे, असे विधान त्यांनी केले आहे.
एकूणच, ४ डिसेंबरच्या प्रदर्शनापूर्वीच या वेब सीरिजवरून राजनैतिक आणि सिनेसृष्टीतील वातावरण तापले असून, भारतात ही सिरीज पाहायला मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





