Maharashtra Digital Services : अंतर्गत १७४ डिजिटल सेवांचे लोकार्पण करण्यात आले. २६ जानेवारीपासून ‘झिरो ब्युरोक्रसी’चे लक्ष्य काय आहे? सरकारी कार्यालयांतील हेलपाटे कमी होणार का? जाणून घ्या सविस्तर.
सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार मारावे लागणारे हेलपाटे, कागदपत्रांची जुळवाजुळव, अनावश्यक प्रतिज्ञापत्रे आणि कामांसाठी होणारा प्रशासकीय विलंब.. आता या सगळ्या त्रासातून नागरिकांची सुटका करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यातील सरकारी कामकाज अधिक पारदर्शक, वेगवान आणि डिजिटल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल १७४ डिजिटल सेवा व प्रणालींचे लोकार्पण केले आहे. (Zero Bureaucracy Maharashtra) येत्या २६ जानेवारी २०२७ पासून राज्यातील नागरिकांना डिजिटल गव्हर्नन्सचा नवा अनुभव देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून, ‘झिरो ब्युरोक्रसी’ आणि पेपरलेस प्रशासनाच्या दिशेने ही महत्त्वाची वाटचाल मानली जात आहे.
१७४ डिजिटल सेवांचे लोकार्पण; कोणत्या प्लॅटफॉर्मवर किती सेवा?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे प्रशासकीय प्रक्रिया पुनर्रचना (Government Process Re-engineering – GPR) उपक्रमांतर्गत विविध डिजिटल सेवांचा शुभारंभ करण्यात आला. या १७४ सेवांचे तीन प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्मवर वर्गीकरण करण्यात आले आहे.
- मैत्री २.० : या प्लॅटफॉर्मवर ७६ सेवांचा समावेश आहे.
- आपले सरकार २.० (RTS 2.0) : या माध्यमातून ७४ नागरी सेवांचा विस्तार करण्यात आला आहे.
- महाडीबीटी २.० : थेट लाभ हस्तांतरणाशी संबंधित २४ योजनांचा समावेश आहे.
या माध्यमातून सरकारी सेवा नागरिकांपर्यंत अधिक वेगाने पोहोचवणे, अर्ज प्रक्रियेतील अडथळे कमी करणे आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणणे हा सरकारचा प्रयत्न आहे.
‘झिरो ब्युरोक्रसी’ म्हणजे नेमकं काय?
सरकारी कार्यालयांमधील अनावश्यक प्रक्रिया, फाईल्सचा प्रवास, वारंवार मागितली जाणारी कागदपत्रे आणि कामांमधील मानवी हस्तक्षेप कमी करणे, हा ‘झिरो ब्युरोक्रसी’ संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनातील अनावश्यक टप्पे कमी करून पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व वाढवण्यावर भर दिला आहे. ( (174 Digital Services) नागरिकांना छोट्या-मोठ्या कामांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी डिजिटल प्रणाली अधिक सक्षम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नावश्यक प्रतिज्ञापत्रे रद्द करणे, एकाच कागदपत्राची वारंवार मागणी टाळणे आणि शक्य तिथे संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करणे यावर सरकारचा भर राहणार आहे.
हेही वाचा : ४२.३० लाख शेतकऱ्यांना पुढील ३ महिने मोफत धान्य; प्रत्येक व्यक्तीला किती किलो मिळणार? जाणून घ्या पात्रता
१,१२९ प्रशासकीय प्रक्रियांपैकी ३९७ पूर्ण
राज्य सरकारने प्रशासकीय प्रक्रिया अधिक सोप्या करण्यासाठी एकूण १,१२९ प्रक्रियांची पुनर्रचना करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यापैकी आतापर्यंत ३९७ प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, सुमारे ३५ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. (Aaple Sarkar) या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ७२९ शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. तसेच सुमारे ३५० सेवांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. येत्या २४ डिसेंबरपर्यंत आणखी काही महत्त्वाच्या सेवा सुरू करण्याचे नियोजन असून, ३१ डिसेंबरपर्यंत आवश्यक तांत्रिक कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पेन्शनधारकांना मोठा दिलासा; मोबाईलवरच मिळणार डिजिटल जीवन प्रमाणपत्र
या डिजिटल उपक्रमातील ‘महाउपलब्धी’ ही प्रणाली विशेष महत्त्वाची ठरणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारक आणि विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना मोबाईलवरच डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करता येणार आहे. (MahaDBT 2.0) सध्या जीवन प्रमाणपत्रासाठी अनेकदा संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता भासते. मात्र, डिजिटल सुविधेमुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो.
आणखी कोणत्या डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आल्या?
१७४ डिजिटल सेवांबरोबरच राज्य सरकारने प्रशासकीय कामकाजासाठी काही महत्त्वाच्या प्रणालीही सुरू केल्या आहेत.
- महासारथी : सरकारी योजनांची अचूकता आणि सेवा वितरणाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी डेटा आधारित प्रशासनाला मदत.
- महाउपलब्धी : मोबाईलवर डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवण्याची सुविधा.
- शासकीय पत्रव्यवहार व्यवस्थापन प्रणाली : केंद्र आणि राज्य सरकारमधील पत्रव्यवहार व त्यावरील कार्यवाहीचा मागोवा घेण्यासाठी.
- शासकीय निवासस्थान वाटप व्यवस्थापन प्रणाली : सरकारी निवासस्थानांच्या वाटप प्रक्रियेचे व्यवस्थापन.
- महाराष्ट्र आधार डॅशबोर्ड : आधारसंबंधित प्रशासकीय कामकाजाचे व्यवस्थापन आणि देखरेख.
२६ जानेवारीपासून नागरिकांना काय बदल अनुभवायला मिळणार?
प्रजासत्ताक दिनापर्यंत राज्यातील सर्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाने डिजिटल गव्हर्नन्सच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे सरकारी सेवांसाठी लागणारी कागदपत्रे कमी होणे, ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला गती मिळणे, अर्जांची स्थिती समजणे आणि सरकारी योजनांचा लाभ अधिक पारदर्शकपणे मिळणे अपेक्षित आहे. मात्र, या सर्व सेवांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना कितपत आणि किती वेगाने मिळतो, हे अंमलबजावणीवर अवलंबून असेल. त्यामुळे २६ जानेवारी २०२७ पर्यंत होणाऱ्या बदलांकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
LS Marathi – महाराष्ट्रातील बातम्या, पर्यटन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.









