Maharashtra Drought Farmer Crisis : ही फक्त पावसाची गोष्ट नाही…ही मातीशी इमान राखणाऱ्या माणसाची गोष्ट आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी…ढग येतात…आशा जागते… आणि पुन्हा आभाळ कोरडंच निघून जातं. शेतात पिकाऐवजी आता प्रश्न उभे आहेत…पेरणीसाठी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? घर चालवायचं कसं? आणि पुढचा हंगाम पेरायचा कशावर?महाराष्ट्राच्या मोठ्या भागावर दुष्काळाचं सावट आहे. कागदावर आकडे आहेत… तालुके आहेत…नुकसानाचे पंचनामे आहेत…पण त्या आकड्यांच्या मागे एक शेतकरी आहे…ज्याच्या हातात माती आहे, पण त्या मातीतून उगवलेलं पीक नाही.
रिकाम्या खिशाने शेतकरी पुन्हा मातीवर विश्वास कसा ठेवणार? दुष्काळ म्हणजे फक्त कोरडी जमीन नाही…दुष्काळ म्हणजे शेतकऱ्याच्या डोळ्यात उरलेली शेवटची आशाही कोरडी होण्याची वेळ. म्हणून प्रश्न पावसाचा नाही…प्रश्न आहे
या मातीत राबणाऱ्या माणसाला…आज मी स्टुडिओतून दुष्काळाची बातमी सांगायला उभा नाहीये…आज मी एका मृत्यूचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट वाचायला उभा आहे. नाही…हा मृत्यू माणसाचा नाही. हा मृत्यू आहे पिकाचा…एका शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टाचा…आणि कदाचित… एका कुटुंबाच्या उद्याच्या स्वप्नाचा.
पाऊस येण्याच्या आशेने शेतकरी आभाळाकडे पाहतोय ( Maharashtra Drought )
महाराष्ट्राच्या नकाशावर एक गाव शोधून बघा…त्या गावाच्या एखाद्या बांधावर जा. तिथं तुम्हाला एखादा शेतकरी दिसेल…आभाळाकडे पाहत. त्याच्या हातात मोबाईल असेल… पण तो मोबाईलवर शेअर बाजार पाहत नसेल…तो हवामानाचा अंदाज पाहत असेल. कारण आज त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय… आभाळ घेतंय. त्याने पेरलं…बियाणं विकत घेतलं…खत टाकलं…औषधं फवारली…पैसा कमी पडला म्हणून कर्ज घेतलं…आणि प्रत्येक वेळी स्वतःला एकच सांगितलं…“यंदा पीक चांगलं आलं की सगळं ठीक होईल.” पण… पाऊस आला नाही. पीक उभं राहिलं नाही. आणि आता प्रश्न फक्त शेतातला नाही…घरातला आहे.
पिकं वाळली की फक्त जमीन कोरडी होत नाही…शेतकऱ्याच्या घरातली गणितंही कोरडी पडतात. बियाण्याचे पैसे…खताचे पैसे…औषधाचे पैसे…मजुरीचे पैसे… वीजेचं बिल…बँकेचा हप्ता…आणि शेवटी हातात? शून्य. कधी कधी… शून्यापेक्षाही कमी. सरकार म्हणतं…दुष्काळ जाहीर झाला. पंचनामे होतील… मदत मिळेल…नुकसानभरपाई मिळेल…सगळं होईल. पण एक प्रश्न आहे…ज्या शेतकऱ्याचं आजचं पीक गेलंय, त्याला उद्यापर्यंत जगण्यासाठी काय मिळणार? “दुष्काळ जाहीर झाला… पण तुमच्या आयुष्यात त्याचा दिलासा दिसतोय का?” कागदावर दुष्काळ जाहीर करणं सोपं आहे…पण दुष्काळाच्या सावलीत जगणाऱ्या माणसाला उभं करणं? ती खरी परीक्षा आहे.
हेही वाचा : करवीरचा राजा गणपती कोसळला; विसर्जन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
कर्जाचा हप्ता, वीज बिल आणि पुढच्या हंगामाची चिंता ( Maharashtra Drought Farmer Crisis )
कारण दुष्काळ फक्त पिकाचा नसतो…तो पाण्याचा असतो…तो चाऱ्याचा असतो… तो पैशाचा असतो… तो कर्जाचा असतो…आणि शेवटी तो माणसाच्या आशेचाही असतो. एक गंमत आहे…शेतकऱ्याला आपण नेहमी सांगतो “शेतीत जोखीम असते.”
हो…जोखीम असते.पण प्रश्न असा आहे…जोखीम नेहमी शेतकऱ्यानेच का घ्यायची? पाऊस नाही पडला तर शेतकरी अडचणीत…पाऊस जास्त झाला तर शेतकरी अडचणीत…भाव पडला तर शेतकरी अडचणीत…खर्च वाढला तर शेतकरी अडचणीत…ज्या हातांनी महाराष्ट्राची माती हिरवी केली…त्याच हातांनी आज घरचा खर्च कसा भागवायचा याचा हिशोब मांडलाय. ज्या बापाने मुलाला शिकवलं…तोच बाप आता विचारतोय “पुढच्या वर्षी फी कुठून भरायची?” ज्या आईने घरात धान्य भरलं…तीच आई आता डब्यात किती उरलंय हे मोजतेय. आणि शेतकरी? तो पुन्हा आभाळाकडे पाहतोय…कारण त्याच्याकडे दुसरं आभाळ नाही.
शेतकऱ्याची जोखीम नेहमीच त्याच्याच वाट्याला का?
दुष्काळाची आकडेवारी सांगता येते…किती तालुके…किती हेक्टर…किती नुकसान…किती मदत… सगळ्याचा हिशोब करता येतो. पण…एका बापाच्या काळजीचा आकडा किती?.एका आईच्या डोळ्यातल्या पाण्याची किंमत किती? आणि…एका शेतकऱ्याच्या मोडलेल्या आशेची नुकसानभरपाई किती? याचा पंचनामा कुठल्या फॉर्मवर होतो? दुष्काळ पडला की आपण आभाळाला दोष देतो…पण निसर्गाशी लढणं माणसाच्या हातात नसतं. व्यवस्थेने मात्र माणसाच्या बाजूने उभं राहणं. माणसाच्या हातात असतं. म्हणून सवाल पावसाला नाही…सवाल व्यवस्थेला आहे. पिकं वाचली नाहीत, ठीक…पण शेतकरी तरी वाचणार कसा
आज शेतात उभं पीक नाही…पण एक प्रश्न उभा आहे. “माझं पीक गेलं…माझे पैसे गेले…माझं कर्ज वाढलं…
कारण…दुष्काळ पडला की पिकं पुन्हा पेरता येतात…पण शेतकऱ्याच्या मनातला व्यवस्थेवरचा विश्वास एकदा करपला…तर तो पुन्हा हिरवा करायला फक्त पाऊस पुरत नाही.








