उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाने दुचाकीवरील एका कुटुंबाला जोरदार धडक दिल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी तेलगाव-धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कुसुम सुदे (वय ३०) यांचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. त्यांच्यावर लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्याकडून उपचारादरम्यान कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही, अखेर काल रात्री डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं. त्यांच्या हा अचानक मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब आता उघडण्यावर पडलं आहे.
कुसुम सुदे, दोन लहान मुली रागिणी व अक्षरा गंभीर जखमी झाले होते
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या घटनेनंतरच त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. अपघातावेळी विष्णू दामोदर सुदे (वय ३५) वर्षे हे दुचाकीवरून आपल्या कुटुंबासोबत जात असताना अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या बंबाने त्यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात सुदे यांच्यासह पत्नी कुसुम सुदे, दोन लहान मुली रागिणी (वय ९) व अक्षरा (६ वर्षे) हे सर्व गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर या सर्वांवर लातूर येथे उपचार सुरू होते. मात्र, काल रात्री कुसूम सुदे यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान कुसूम यांच्या पार्थिवावर दिंद्रुड येथे मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघाताची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी
कुसुम यांच्या निधनाने सुदे कुटुंबात तसचं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दोन निष्पाप मुलींसह संपूर्ण कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झाल्यानं स्थानिक नागरिकांनी या अपघाताची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, जखमी विष्णू सुदे आणि त्यांच्या दोन्ही मुलींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे. या हृदयद्रावक घटनेने ताफ्यातील वाहनांच्या वेग आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.












