Dowry Black Magic Case : पत्नीच्या माहेरून हुंडा मिळावा यासाठी पत्नीच्या घरात जाऊन जंतर मंतर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणाची माहिती भिवंडी येथील निजामपुरा पोलीस ठाण्यातुन समोर आला आहे. याप्रकरणी पीडित 36 वर्षीय पत्नीच्या तक्रारीवरून पतीसह सासू, सासरा आणि 3 नणंद अशा 6 जणांच्या विरोधात जादूटोणा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी येथे राहत असलेल्या पत्नीला गंभीर आजार जडलेला असतानाच पतीने हुंडा मिळावा यासाठी पत्नीच्या घरी जाऊन जंतर मंतर करत जादूटोणा केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. या प्रकरणाची माहिती मिळताच पती योगेशकुमार केशरवानी, सासरा ओमकारनाथ केशरवानी, सासू चंद्रावती कैशरवानी, नणंद भावना मल्होत्रा, अनुराधा अरोरा, श्रद्धा बोबडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा : जळगाव हादरलं! अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून वारंवार अत्याचार
काय आहे प्रकरण
पीडित 36 वर्षीय पत्नी भिवंडीत राहत असून रुग्णालयात कर्करोगाशी चौथ्या टप्प्यात झुंज देत आहे. 2015 पासून पीडितेचा हुंड्यासाठी छळ करण्यात येत होता. 2015 या वर्षांपासून प्रत्येक अमावस्येला पीडिता अपशकुनी असल्याचे गृहीत धरून पीडिता सासरी नांदत असताना घरात काळ्या जादूची पूजा मांडून पत्नीला शारीरिक,मानसिक त्रास देण्यात आला. त्यातच सप्टेंबर 2025 मध्ये पीडितेला कर्करोग झाल्याचे समजल्यावर आरोपी पतीने पत्नीला 7 डिसेंबर रोजी मुलासह घरातून हाकलून दिल्याचे पीडितेने सांगितले आहे.
मारहाण केल्याचा प्रकार उघड
याशिवाय पतीने पत्नीवर उपचार न करता उलट पीडितेच्या मुलासह बहिणीला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर 22 जानेवारी रोजी पती योगेशकुमार केशरवानी ह्याने पुन्हा पीडिता राहत असलेल्या भिवंडीतील घराच्या दरवाज्या समोर कुंकू, कापलेले लिंबू आणि काळ्या बाहुल्या टाकून आपल्याला जीवे मारण्यासाठी हा जादूटोण्याचा प्रकार केल्याचा धक्कादायक खुलासा पीडित पत्नीने केला आहे.
गुन्हा दाखल
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या मंडळीच्या विरोधात निजामपूरा पोलिस ठाण्यात नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याचा कायदा ३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.












