Mother kills six-year-old daughter : नवी मुंबईतील कळंबोली उपनगरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या आईनेच सहा वर्षांच्या चिमुरडीचा गुदमरून खून केल्याचा प्रकार कळंबोलीतील सेक्टर 1 मधील गुरूसंकल्प हाऊसिंग सोसायटीत घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी संबंधित ३० वर्षीय महिलेला अटक केली आहे.
काय हे संपूर्ण प्रकरण
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूसंकल्प सोसायटीत आयटी अभियंता पती आणि बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतलेली पत्नी वास्तव्यास होते. 2017 मध्ये विवाह झाल्यानंतर 2019 साली त्यांना कन्यारत्न झाले. मात्र, सहा वर्षांच्या या मुलीला लहानपणापासून बोलण्यात अडथळा येत होता. ती मराठीऐवजी हिंदी भाषेत अधिक बोलत असल्याने आई सतत नाराज होती. “मुलगी नको, ती व्यवस्थित बोलत नाही,” असे ती अनेकदा पतीकडे सांगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पतीने तिला समज देण्याचा प्रयत्न केला होता.
हे ही वाचा : चौथ्यांदा झाली मुलगी म्हणून निर्दयी पित्याने केली 3 दिवसाच्या बाळाची हत्या!
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव
अखेर २३ डिसेंबरच्या रात्री या आईने मुलगी संपविण्याचा निश्चय केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. त्या दिवशी आजी नातीला भेटण्यासाठी भेटवस्तू घेऊन घरी आली होती; मात्र तिची आणि बालिकेची भेट होऊ शकली नाही. काही वेळाने पती घरी परतल्यानंतर मुलगी झोपेतून उठत नसल्याचे लक्षात येताच सर्वांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. तेथे सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला.
मात्र कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना मृत्यू संशयास्पद वाटल्याने त्यांनी शवविच्छेदनाची विशेष विनंती केली. प्राथमिक अहवालात श्वसनमार्ग अडथळ्याचे संकेत मिळताच आई-वडिलांची कसून चौकशी करण्यात आली. सुमारे सहा तासांच्या चौकशीनंतर अखेर आईनेच मुलीचा गुदमरून खून केल्याची कबुली दिली. या निर्दयी कृत्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, या महिलेवर मनोविकार तज्ज्ञांकडे उपचार सुरू असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.







