Overgaon former sarpanch murder : छत्रपती संभाजीनगर येथील जटवाडा रस्त्यालगतच्या ओव्हरगावमध्ये शेतजमिनीच्या रागातून सरपंचावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
दीर्घकाळापासून सुरू असलेल्या शेतजमिनीच्या ताब्यावरून उसळलेल्या रागातून 11 स्थानिक गुंडांच्या समूहाने माजी सरपंच दादा साहू पठाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर क्रूर हल्ला चढवला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेत दादा पठाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या दोन्ही मुलांना गंभीर दुखापत झाली. हल्ल्याच्या वेळी पठाण कुटुंबातील महिलांनी हात जोडून आरोपींना थांबवण्यासाठी विनंती केली, मात्र, संतापलेल्या टोळीने लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्यांनी सपासप वार केले. हा संपूर्ण प्रकार एका व्हिडिओत कैद झाला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृश्य पाहून परिसरात संताप आणि धडकी भरली आहे. या प्रकरणात पोलिसांनी रात्रीपर्यंत एका आरोपीला ताब्यात घेतले असून, उर्वरित दहा जण फरार आहेत.
हे ही वाचा : टेकवाडा–खामखेडा रस्त्यावर कार जळून खाक; मानवी कवटी आढळल्याने खळबळ
आरोपींची नावे
इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान ,अस्लम गयाज पठाण (उर्फ गुड्डू), हैदर खान गयाज खान पठाण, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फुरकान अजगर पठाण, मोईन इनायत खान पठाण यांचा समावेश आहे.
जागेच्या वादातून हत्या
पठाण कुटुंब हे मूळ ओव्हरगावचे असून, घरापासून थोड्या अंतरावर शाळेजवळ त्यांची शेतजमीन आहे. या जमिनीला लागून एक छोटी वाट जाते, ज्यावरून सुरुवातीला किरकोळ भांडण सुरू झाले. हळूहळू आरोपी टोळीने पूर्ण जमिनीवरच हक्क सांगण्यास सुरुवात केली. यातून अनेकदा वाद झाले होते. बुधवारी सकाळी पठाण यांनी जमीन सपाट करण्यासाठी जेसीबी मशीन बोलावले. याचवेळी १०-११ जणांची टोळी आली आणि थेट हल्ला केला. दादा पठाण यांना वाचवता आले नाही.या घटनेमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. स्थानिकांकडून कायदा-सुव्यवस्थेची मागणी होत आहे.












