पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात प्रचंड गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. हे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नसून पुण्याच्या विस्तारीकरणासह गुन्हेगारीही वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. पुण्यतिळ पिंपरी चिंचवड भागात देखील गुन्हेगारीचे पडसाद उमटत असून गाव गुंडानी शहरात धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे.
पुण्यात कधी कोयता गँगची दहशत पाहायला मिळते तर कधी चड्डी गँगची दहशद बघायला मिळते. यामुळे पुण्याची विद्येचे माहेरघर असल्याची ओळख पुसट होताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड शहरात गाव गुंडांकडून वाहनांची तोडफोड करण्यात येत असून अशा घटना यापूर्वी देखील घडल्या होत्या. ताथवडे परिसरातील एका खाजगी कंपनीच्या गोदामात उभ्या असलेल्या मालवाहू वाहनांची माथेफिरूंनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या माथेफिरूंनी अंमलीपदार्थांचे सेवन करून हा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असल्याची माहिती समोर येत आहे.
या संपूर्ण प्रकारात अंदाजे चार ते पाच मालवाहतुकी करणाऱ्या वाहनांचे नुकसान झाले आहे. या गंभीर घटनेनंतर वाकड पोलिसांनी गावगुंडांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आता नेमकं त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे. नागरिकांनी या घटनेला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या घटना वारंवार घडत असल्याने पोलिसांचा धाक या गावगुंडांना राहिला आहे कि नाही असा प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पोलीस आणखी तपास करत असून या घटनेने नागरिकांना गाडी कुठे लावावी, गाडी पार्क करावी तरी कशी हा प्रश्न उपस्थित होत आहे.