Pune Digital Arrest Scam: पुण्यात ‘डिजिटल अरेस्ट’ च्या नावाखाली ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याने खळबळ उडाली. नेमकं प्रकरण काय आहे. जाणून घेऊयात आजच्या खास लेखात.
पुण्यात सायबर गुन्हेगारांनी रचलेल्या फसवणुकीच्या जाळ्याचा पुणे सायबर (Pune Digital Arrest Scam) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तपास यंत्रणेचा अधिकारी असल्याचे भासवत एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला घाबरवण्यात आले आणि ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली त्यांच्याकडून १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपये उकलण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सोशल मीडियावर रिल्ससाठी ओळख निर्माण केलेल्या रोहन रामेश्वर जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा: पेपरफुटी करणाऱ्यांची खैर नाही! महाराष्ट्रात भरती परीक्षांसाठी सरकारचा मोठा निर्णय
ओळखपात्रांचा गैरवापर करून बनावट बँक खाते
पोलिसांच्या तपासानुसार, जानेवारी महिन्यात आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाच्या कागदपत्रांचा गैरवापर केला. त्यांच्या नावाने कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले. त्यानंतर याच खात्याचा आधार घेत सायबर गुन्हेगारांनी ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधला.
आपण केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे सांगत आरोपींनी त्यांच्या बँक खात्याचा वापर गंभीर गुन्ह्यात झाल्याचा दावा केला. अनेक तक्रारी दाखल झाल्याचे सांगून अटकेची भीती निर्माण करण्यात आली.
‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव रचून मानसिक दबाव (Pune Digital Arrest Scam)
आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला सतत संपर्कात ठेवून चौकशी सुरू असल्याचे भासवले. अटक टाळण्यासाठी तपास प्रक्रियेचा भाग म्हणून पैसे विविध खात्यांमध्ये पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या. (Pune Cyber Crime)
या दबावामुळे ज्येष्ठ नागरिकाने आरोपींनी सांगितलेल्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम पाठवली. अशा प्रकारे काही दिवसांत तब्बल १० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली.
बँक व्यवहारातून आरोपीचा माग काढला
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना एका संशयास्पद व्यवहारातून महत्त्वाचा धागा मिळाला. ३० जानेवारीला एका खात्यात ७५ लाख रुपये जमा झाल्याचे आढळले. त्यानंतर त्यातील ६ लाख ५० हजार रुपये इतर खात्यांकडे वळवण्यात आले होते.
बँक व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज आणि सायबर गुन्ह्यांशी संबंधित डिजिटल माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास पुढे नेला. अखेर पिंपळे गुरव परिसरातून रोहन जाधवला ताब्यात घेण्यात आले.
टोळीतील आणखी चार जण आधीच अटकेत
या प्रकरणात हर्षद सुभाष धनतोले, समर्थ देशमुख, अमर अत्तरगी आणि प्रणव करणसिंग आर्या या चार संशयितांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात या टोळीशी संबंधित देशभरातील २९ गुन्ह्यांची माहिती समोर आली आहे.
तसेच, तपासादरम्यान ५,४३६ बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहार आढळले असून सुमारे १ कोटी ३४ लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन
सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, सीबीआय किंवा इतर सरकारी यंत्रणांचे अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांना घाबरवले जाते. ‘डिजिटल अरेस्ट’, बनावट वॉरंट किंवा खात्याच्या चौकशीचे कारण देऊन पैशांची मागणी केली जात असल्यास नागरिकांनी सावध राहावे.
अनोळखी व्यक्तीला ओटीपी, बँक तपशील किंवा पैसे देऊ नका आणि संशयास्पद कॉलची तातडीने अधिकृत यंत्रणेकडे तक्रार करा, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.







