Shirpur ATM Robbery Attempt : शिरपूर शहरात एटीएम चोरीचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील बँक ऑफ बडोदा बँकेच्या एटीएम मशीनला अज्ञात चोरट्यांनी लोखंडी साखळी बांधून पिकअप वाहनाच्या साहाय्याने ओढून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
सापळा रचून आरोपीला अटक
याबाबत रात्रगस्त पेट्रोलिंगवर असलेल्या शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि अंमलदारांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु घटनास्थळी कोणीही आढळून आले नाही. दरम्यान परिसरात शोध घेत असताना पित्रेश्वर स्टॉपजवळ संशयास्पद पिकअप वाहन दिसून आले. पोलिसांचे वाहन पाहताच आरोपींनी शहादा फाट्याकडे पळ काढला. त्यांनी मुंबई–आग्रा महामार्गावरून मध्यप्रदेशकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना वायरलेसद्वारे माहिती देत शिरपूर तालुका व थाळनेर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी केल्याने आरोपींचा डाव फसला. यानंतर आरोपींनी हाडाखेड येथून यु-टर्न घेत चोपडा रस्त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा : सराईत घरफोडी करणारा चोरटा अटकेत; 5 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न
महामार्गावर बॅरिकेट लावून पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी बॅरिकेट उडवून दहीवद गावात प्रवेश केला आणि पुन्हा चोपडा फाट्याकडे पळ काढला. यावेळी 40 ते 45 मिनिटे हा थरारक पाठलाग सुरू होता. या कारवाईत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी आपल्या स्टाफसह महत्त्वाची भूमिका बजावली. हा पाठलाग करत असताना आरोपींच्या पिकअप वाहनाला बांधलेली 15 ते 20 फूट लांबीची लोखंडी साखळी रस्त्यावर घर्षण होत ठिणग्या उडवत होती. शिरपूर पोलिसांनी जीवाची पर्वा न करता आरोपींच्या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न केला.
अखेर पोलिसांचा पाठलाग थांबणार नाही हे लक्षात येताच आरोपींनी चालत्या वाहनातून उडी मारून पलायन केले. मात्र पुढील तपासात पोलिसांनी मुख्य आरोपींपर्यंत पोहोचत हेमंत सुकलाल माळी आणि विदुर ऊर्फ विजय देवा जाधव यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी युट्यूबवरून एटीएम चोरीची माहिती घेतल्याचे आणि शिरपूरसह धुळे व अमळनेर येथेही एटीएम मशीन ओढून चोरीचा प्रयत्न केल्याचे कबूल केले आहे. आरोपींकडून पिकअप वाहन जप्त करण्यात आले असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.












