Ganpati Visarjan 2026 LIVE : गणपती बाप्पाच्या भक्तीमय उत्सवाची आज अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. राज्यभरात सार्वजनिक गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली असून, मुंबई आणि पुण्यात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
पुण्यातील मानाचे गणपती आणि प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सुमारे १० हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील. तसेच गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी CCTV आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
पुण्यात वाहतुकीत मोठे बदल ( Ganpati Visarjan 2026 LIVE )
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता आणि कुमठेकर रस्ता यांसह अनेक मार्गांवर टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद किंवा वळवली जाणार आहे. अवजड वाहनांवरही ४८ तासांसाठी निर्बंध ठेवण्यात आले आहेत.
कुमठेकर आणि केळकर रस्त्यावर १५० मंडळांना परवानगी
यंदा पुणे पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीचे नियोजन करताना कुमठेकर आणि केळकर रस्त्यावरून फक्त १५० गणेश मंडळांना मिरवणूक काढण्याची परवानगी दिली आहे. शहरातील एकूण ६३८ मंडळांच्या मिरवणुका प्रमुख चार मार्गांवरून जाणार आहेत.
मुंबईतही विसर्जनासाठी जय्यत तयारी ( Ganpati Visarjan 2026 )
मुंबईतील गिरगाव चौपाटीसह विविध विसर्जनस्थळी महापालिका आणि पोलिसांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या गणेशमूर्तींसाठी स्वतंत्र मार्ग आणि विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे सुमारे २५ हजार अधिकारी-कर्मचारी विसर्जन व्यवस्थेसाठी तैनात असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईकरांसाठी विशेष लोकल
गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष रात्रीच्या लोकल फेऱ्या चालवण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका आणि दर्शनासाठी बाहेर असलेल्या भाविकांना रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
आज कुठे किती गर्दी? कोणत्या रस्त्यावर वाहतूक बंद? ( Ganpati Visarjan Traffic )
आजच्या दिवशी भाविकांसाठी सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे प्रसिद्ध गणपतींची विसर्जन मिरवणूक सध्या कुठे आहे, कोणता मार्ग बंद आहे आणि कोणता पर्यायी मार्ग वापरता येईल, याची माहिती. पुणे पोलिसांच्या ऑनलाइन सुविधेद्वारे विसर्जन मिरवणुकीची सद्यस्थिती, मार्ग आणि वाहतूक बदलांची माहिती मिळणार आहे.
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!









