Ahilyanagar Acid Attack: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एका ११ वर्षीय मुलीवर धक्कादायक अॅसिड हल्ला झाला. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अज्ञात आरोपीने मुलीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. गंभीर जखमी झालेली मुलगी उपचारासाठी लोणी येथे हलवण्यात आली असून, आरोपी अद्याप फरार आहे.
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या १२ वर्षीय मुलीवर धक्कादायक अॅसिड हल्ला झाला. अचानक रस्त्यावर थांबलेल्या दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तीने मुलीवर अॅसिड फेकले. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने लोणी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा: सोलापुर-हिंगोलीसह अनेक शहरात अवकाळी पावसाचा कहर; गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
घटनेनंतर मुलीने आरडाओरडा केला, आणि परिसरातील नागरिक तिथे धावले. मात्र आरोपी दुचाकीवरून पसार झाला. तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अॅसिड फेकणाऱ्या आरोपीचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्यामुळे आसपासच्या परिसरातील कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहेत.
अॅसिड हल्ल्यात जखमी झालेली मुलगी गरीब कुटुंबातील असून नातेवाइकांकडे राहून शिक्षण घेत होती. तिच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे त्वरित तक्रार केली असून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तालुक्यातील या घटनांमुळे नागरिक आणि स्थानिक नेत्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे, कारण फक्त दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील रणखांब गावात लग्नाला नकार दिल्याने एका मुलीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे लोकांमध्ये सुरक्षिततेबाबत मोठा भीतीचा माहोल निर्माण झाला आहे.












