Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • अजितदादांचे अचाकन अपघाती निधन, राज्यात ३ दिवस शासकीय दुखवटा जाहीर
Top News

अजितदादांचे अचाकन अपघाती निधन, राज्यात ३ दिवस शासकीय दुखवटा जाहीर

Ajit Pawar death news

Ajit Pawar death news : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे. अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत लोकनेता हरवल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच राज्यामध्ये आज शासकीय सुट्टीसह २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला – राज ठाकरे यांची भावुक पोस्ट

एक दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“अजित पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेले नेते होते. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारे आहे. माझ्यासाठी वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला आहे. पंतप्रधान,गृहमंत्री यांच्याी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या घटनेची कल्पना दिली आहे. त्यांनीही प्रचंड दुख व्यक्त केले आहे. संपूर्ण देशात या घटनेमुळ हळहळ पसरली आहे. पुढील गोष्टी परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांचे अकाली निधन हे एक कधीही न येणारे नुकसान – राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

“महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेकांच्या मृत्यूची बातमी ऐकून खूप दुःख झाले आहे. अजित पवार यांचे अकाली निधन हे एक कधीही न येणारे नुकसान आहे. महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियाना, समर्थकांना आणि चाहत्यांना मनापासून संवेदना व्यक्त करत,” राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला – उद्धव ठाकरे

‘‘एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला.’’ अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत. अजित पवार अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली, ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली! अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी – नितीन गडकरी

“गेली अनेक वर्ष राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यांमुळे अजितदादांचे कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान राहिले आहे. महाराष्ट्राच्या विकासाची आकांक्षा असलेल्या या लोकनेत्याचे अकाली निधन होणे, ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत,” अशी भावना देशाचे रस्तेवाहतून मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

अजित पवारांच्या निधनाची बातमी वेदना आणि मनाला चटका लावणारी – एकनाथ शिंदे

“अजित पवारांच्या निधनाची बातमी वेदना आणि मनाला चटका लावणारी आहे. अजितदादा आपल्याला एवढ्या लवकर सोडून जातील असं कधीही वाटलं नव्हतं. परखड, स्पष्टवक्ते मात्र मनाने अतिशय निर्मळ अशा स्वभावाचे ते होते. मी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात होतो. एकदा करायचं ठरवलं की ते करायचेच. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. आम्ही टीम म्हणून काम केले. अजितदादा पहाटे लवकर काम सुरु करायचे. सकाळी ६ वाजता देखील त्यांनी वेळ दिलेलं अनेकांनी पाहिलं आहे. काल-परवाच आमची भेट झाली होती. सकाळी ही घटना कळली तेव्हा काल-परवाच्या आठवणी समोर येऊ लागल्या. माझ्यापेक्षा राजकारणात आणि वयाने ते मोठे होते. राज्यातील अनेक विषयांचा त्यांचा अभ्यास होता. राज्याला त्याचा फायदा होत होता”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

एक निडर आणि साहसी व्यक्तिमत्व म्हणून अजित पवारांची ओळख – जितेंद्र आव्हाड

“अजितदादा यांच्या अकाली जाण्याने सबंध महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. एक निडर आणि साहसी व्यक्तिमत्व म्हणून मी अजित दादा यांचे वर्णन करीन. अजित पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या तालमीत तयार झालेले व्यक्तिमत्त्व! त्यामुळेच सत्ता ही लोकांसाठी आहे, याचे भान असलेले नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार! आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे बोट धरून ते राजकारणात आले, हे खरे, पण त्यानंतर त्यांनी आपली स्वतःची ओळख तयार केली, ती स्वतःच्या कर्तबगारीने, दादा, भावपूर्ण आदरांजली!!”अशा भावना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts