Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला – राज ठाकरे यांची भावुक पोस्ट
Top News

महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला – राज ठाकरे यांची भावुक पोस्ट

Raj Thackeray emotional post

Raj Thackeray emotional post : आज सकाळी 8 ते 8.30 वाजेच्या सुमारास आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चार्टड विमानाचा अपघात झाला. या अपघातात महाराष्ट्राचे आणि लाडक्या बहिणींचे दादा म्हणजेच अजित पवार यांचे निधन झाले. राजकारणातून नाही तर या जगातून त्यांची अकाली एक्सिट झाली. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांचा देखील अपघाती मृत्यू झाला.

आज सकाळी मुंबई येथून बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चार्टड विमान बारामतीत लँडिंग करणार होते. परंतु लँडिंग वेळी विमानाचा अपघात घडला. या अपघातात महाराष्ट्राचे लाडके दादा अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राला एक धक्काच बसला आहे. या घटनेने महाराष्ट्रातील जनसमुदाय नाही तर राजकीय नेत्यांनी देखी हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय नेत्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारी पोस्ट शेअर केली असून अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

काय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची पोस्ट

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले कि, माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.

राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं

1990 च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील. प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.

हे ही वाचासहकारी चळवळीपासून उपमुख्यमंत्रीपदापर्यंत… नेहमीच सत्ता सांभाळणारे अजित पवार कोण होते?

आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता

अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो. अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.

राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे. मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली. अशा आशयाची पोस्ट मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts