Jalgaon Well Pushing Incident : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साक्री गावात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. नववीत शिक्षण घेणाऱ्या दोन १५ वर्षीय मुलींना एका माथेफिरू तरुणाने थेट विहिरीत ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, दोन्ही मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील आरोपी तरुणाने स्वतःच गावकऱ्यांना ‘मी दोघींना विहिरीत ढकललं’ अशी कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर गावकऱ्यांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.
हेही वाचा – विद्येचे माहेरघर हादरले ! वाघोलीत आईने चाकूने चिरला मुलाचा गळा, मुलीवरही सपासप वार
स्थानिकांच्या माहितीनुसार, दोन्ही मुली नेहमीप्रमाणे सकाळी ८ ते ८.३० च्या सुमारास क्लासला जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. आदल्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर घटनेला दुजोरा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपीला कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘जोपर्यंत आरोपीला कठोर शिक्षा होत नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,’ अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी उत्तरीय तपासणीसाठी आलेली रुग्णवाहिका अडवून धरली. काही काळासाठी परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती.
वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी
गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.












