Shiv Sena Leaders Close to NCP BJP Entry Talks : शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख, माजी महापौर संजोग वाघेरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासोबत चांगलीच जवळीक आहे. मात्र, मागील काही दिवसांच्या घडामोडी पाहाता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. वाघेरे यांची भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासोबत बैठक झाली आहे. त्यामुळे वाघेरे भाजपचे कमळ हाती घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय असलेले संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी राष्ट्रवादी शहराध्यक्ष पदही भुषवले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पवार यांची साथ सोडली. शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला. या पक्षाकडून त्यांनी मावळमधून लोकसभेची निवडणूक लढविली. चांगली लढत दिली पण, अपयश आले. विधानसभा निवडणुकीनंतर वाघेरे पुन्हा स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू असताना त्यांची शहर शिवसेनेच्या (ठाकरे) प्रभारी शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. दुसरीकडे वाघेरे यांच्या पत्नी, महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषा वाघेरे या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सक्रिय झाल्या. त्यांची पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या संघटिकापदी नियुक्ती करण्यात आली आहे.
स्वगृही परतण्याच्या वावड्या निष्फाळ
संजोग वाघेरे यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत सातत्याने वावर असतो. त्यामुळे वाघेरे हे पुन्हा स्वगृही म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याची चर्चा सुरू होती. आता वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी भाजपमध्ये जाण्याची चाचपणी सुरू केली आहे. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्याशी वाघेरे यांचे नातेसंबंध आहेत. त्यांच्या माध्यमातून वाघेरे यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू आहेत. वाघेरे, आमदार लांडगे आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची एक बैठक नुकतीच झाली आहे.
भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याच्या अंतिम निर्णयापर्यंत आलो नाही – संजोग वाघेरे
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजोग वाघेरे म्हणाले, ‘आमदार महेश लांडगे आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासोबत भेट झाली आहे. पण, भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याच्या अंतिम निर्णयापर्यंत आलो नाही. त्यांच्यासोबत दुसऱ्या एका कामाबाबतही चर्चा झाली आहे’. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजोग वाघेरे यांची सहज भेट झाल्याचे भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितलं.












