AC Travel Health Risks : भारतामध्ये एक काळ होता जिथे स्वतः ची कार असणे ही फा मोठी गोष्ट समजली जायची आणि एसी कार तर त्याहुनही मोठी गोष्ट होती. त्या दिवसांमध्ये क्वचितप्रसंगी एखाद्या अतिश्रीमंत माणसाच्या एसी कारमध्ये बसण्याचा योग आलाच तर त्याला इंद्राच्या ऐरावतस्वारीसारखा आनंद व्हायचा. प्रिमिअर पद्मिनी आणि अॅम्बेसेडरच्या राज्यामध्ये तर कार घेणे हे सामान्य वर्गासाठी तर सोडाच , पण मध्यमवर्गासाठी सुद्धा जिथे अप्राप्य स्वप्न होते, तिथे एसी कार घेण्याचा तर विचारही सामान्य जनांच्या मनात येणे कठीण! आता प्रत्येकाचा घरासमोर एसी कार उभी असते. मात्र, या एसी कारबद्दल खुप वेगवेगळे गैरसमज पसरले जातात. त्यापैकी एक म्हणजे एसीची प्रवास म्हणजे एक प्रकारे आजारांना निमंत्रणच आहे असं समजलं जात. मात्र, यातील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या लेखात करण्यात आला आहे.
१९९०च्या आसपास लहानशी मारुती कार आली आणि लोकांना एसी कारचा आनंद म्हणजे काय, ते माहीत झाले. लोक एसी कारमध्ये बसण्याची स्वप्ने तरी बघू लागले. मारुतीमागोमाग आली झेन आणि मग त्यानंतर एकामागून एक आंतरराष्ट्रीय बॅन्ड्सच्या कार्सची रांगच लागली. सध्या परिस्थिती अशी आहे की उत्तम दर्जाच्या सेकंड हॅन्ड कार्स सहज आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध आहेत. लहान आकाराच्या नवीन कार सुद्धा मध्यम वर्गियांच्या सहज आवाक्यात आल्या आहेत.
हेही वाचा – हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करावी, का थंड ? तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार का योग्य?
आम्ही भाग्यवान म्हणून आम्हांला हे सुख लाभले असा लोकांचा समज असतो
आज घराघरातून लोकांकडे एसी कार आहेत. त्यामुळे लोक आता कारमधून गारेगार प्रवास करण्याचा आनंद लुटत आहेत. बाहेर उष्मा असतानाही आपल्या स्वतःच्या एसीकारमधून थंडाव्याचा आनंद घेत बाहेरच्या उन्हाळ्याला पाहाण्याचा आनंद काही औरच! अशा वेळी “आम्ही भाग्यवान म्हणून आम्हांला हे सुख लाभले हो” असे लोकांना वाटते. पण कारचा हा एसी तुमचे आणि तुमच्या लाडक्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आणू शकतो, याची माहिती या नवकारमालकांना आहे का?
श्वसनविकारांना कारणीभूत अशा विशिष्ट प्रकारच्या बुरशीची वाढ एसीच्या यंत्रणेमध्ये होते
कारची सर्विसिंग न करणे, कारच्या एसीची सर्विसिंग न करणे, कारमध्ये व एसीमध्ये ओलसरपणा तयार होणे, कार ओलसर-दमट वातावरणामध्ये राहणे वगैरे कारणांमुळे कारमध्ये रोगजंतुंची वाढ होते. त्यामध्येही श्वसनविकारांना कारणीभूत अशा विशिष्ट प्रकारच्या बुरशीची वाढ एसीच्या यंत्रणेमध्ये होते. कारमध्ये खाली पसरलेल्या मॅटला आलेला ओलसरपणा सुद्धा बुरशीला जन्म देतो, त्यामुळेे काही आजारांना आमंत्रण मिळते हे नक्कीच आहे.
श्वास घेण्यास त्रास होणे, डोळे चुरचुरणे, डोकं जड होणे, शिंका, नाक खाजणे, घसा दुखणे, खोकला हे आजार उद्भवतात
कारमध्ये खाताना निष्काळजीपणे त्या अन्नाचा अंश कारमध्ये सांडल्याने त्यावर पोसल्या जाणाऱ्या किटक, झुरळ आदींची वाढ कारमध्ये होते, जे रोगजंतुंचे वाहक होऊ शकतात. साहजिकच जेव्हा तुम्ही कारमध्ये बसून थंडगार एसीचा आनंद घेत असता, तेव्हा श्वसनामार्फत हे रोगजंतू तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात. कारमध्ये बसल्यावर किंवा थोड्या वेळाने तुम्हांला जर श्वास घेण्यास त्रास होणे, डोळे चुरचुरणे, डोकं जड होणे, शिंका, नाक खाजणे, घसा दुखणे, खोकला अशा तक्रारींचा त्रास होत असेल तर त्यामागे तुमच्या कारच्या एसीमधील व इतरत्र असलेले रोगजंतु हे कारण असू शकते. अनेकदा घरातल्या लहान मुलांच्या खोकल्या-दम्यामागे कारचा एसी हे कारण असते.












