Food Divorce Trend: बदलत्या काळानुसार आपल्या जीवनशैलीत अनेक नवे बदल होत आहेत. याचा परिणाम वैवाहिक नात्यांवरही दिसून येत असून, सध्या कपल्समध्ये एक अनोखा ट्रेंड चर्चेत आला आहे. हा ट्रेंड नेमका काय आहे आणि त्याला ‘फूड डिवोर्स’ का म्हटलं जातं? चला, जाणून घेऊया.
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम केवळ कामाच्या पद्धतीवर नाही, तर नातेसंबंधांवरही (Relationship Trend) होत आहे. व्यस्त दिनक्रम, वेगवेगळ्या खाण्याच्या सवयी आणि फिटनेसकडे वाढलेलं लक्ष यामुळे अनेक जोडपी जेवणाच्या बाबतीत स्वतंत्र पर्याय निवडतात दिसतात. याच पद्धतीला सध्या ‘फूड डिवोर्स’ असं म्हटलं जात आहे.
नावात ‘डिवोर्स’ असलं तरी हा वैवाहिक घटस्फोटाचा प्रकार नाही. याचा संबंध फक्त कपलच्या खाण्याच्या सवयी आणि जेवणाच्या पद्धतीशी आहे.
हेही वाचा: मुली पायावर पाय घालून बसतात, पण का? कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!
‘फूड डिवोर्स’ची संकल्पना काय?
समजा, पतीला कमी कॅलरी असलेलं जेवण आवडतं आणि पत्नीला पारंपरिक पदार्थ खायला आवडतात. अशावेळी दोघांना एकच पदार्थ खाण्याऐवजी आपापल्या पसंतीनुसार जेवण करणं, याला ‘फूड डिवोर्स’ म्हणता येतं. (Couples Eating Habits)
काही जोडप्यांमध्ये जेवणाची वेळही वेगळी असते. एक जण सकाळच्या शिफ्टमध्ये काम करत असेल, तर दुसऱ्याची कामाची वेळ रात्रीची असू शकते. परिणामी एकत्र जेवण्याऐवजी दोघे आपल्या सोयीच्या वेळेनुसार जेवतात.
नेमकी ही पद्धत का वाढतेय? (Food Divorce Trend)
आज अनेक जण आपल्या आहाराबाबत जागरूक झाले आहेत. वजन नियंत्रण, व्यायाम, प्रोटीनयुक्त आहार, शाकाहारी किंवा इतर विशिष्ट आहारपद्धती यामुळे घरातील दोघांचा मेन्यू सारखा असेलच असं नाही.
याशिवाय ऑफिसच्या वेळा, प्रवास आणि सतत बदलणाऱ्या दिनचर्येमुळेही कपल्सच्या जेवणाच्या वेळा जुळत नाहीत. काही वेळा स्वयंपाकाचा वेळ वाचवण्यासाठी प्रत्येक जण स्वतःच्या आवडीचं जेवण तयार करतो किंवा बाहेरून मागवतो. ( LS Marathi News Channel )
यामध्ये फायदा काय?
या पद्धतीमुळे प्रत्येकाला आपल्या आवडीचा आणि गरजेनुसार आहार घेण्याचं स्वातंत्र्य मिळतं. पार्टनरच्या आवडीसाठी स्वतःच्या डाएटमध्ये वारंवार बदल करण्याची गरज राहत नाही. जेवणावरून होणारे छोटे-मोठे मतभेदही कमी होऊ शकतात.
या गोष्टींची काळजीही घ्यावी
जेवण हा अनेक कुटुंबांमध्ये संवादाचा महत्त्वाचा भाग असतो. दिवसभरातील अनुभव शेअर करण्यासाठी किंवा निवांत गप्पा मारण्यासाठी जेवणाची वेळ उपयोगी ठरते. त्यामुळे सतत वेगवेगळ्या वेळी आणि स्वतंत्रपणे जेवण्याची सवय लागल्यास एकत्र वेळ कमी होऊ शकतो.
तसंच दोघांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवणे किंवा वारंवार स्वतंत्रपणे फूड ऑर्डर करणे यामुळे घरच्या खर्चावरही परिणाम होऊ शकतो.
‘फूड डिवोर्स’ टाळायचा की स्वीकारायचा?
यासाठी प्रत्येक जोडप्याची परिस्थिती वेगळी आहे. आहाराच्या गरजा किंवा कामाच्या वेळा वेगळ्या असतील तर स्वतंत्र जेवणात काही गैर नाही. मात्र जेवण वेगळं असलं तरी एकमेकांसाठी वेळ देणं आणि संवाद कायम ठेवणं महत्त्वाचं आहे.
कधी एकत्र चहा, कधी विकेंडला एकत्र जेवण किंवा फक्त काही मिनिटं निवांत गप्पा नात्यातील जवळीक टिकवण्यासाठी एवढंसुद्धा पुरेसं ठरू शकतं.
म्हणूनच ‘फूड डिवोर्स’ म्हणजे नात्यात दुरावा निर्माण होणं असंच नाही; तो बदलत्या जीवनशैलीनुसार खाण्याच्या सवयींमध्ये आलेला एक नवा पॅटर्न आहे. मात्र ताटं वेगळी झाली तरी मनं दूर जाऊ नयेत, याची काळजी घेणं गरजेचं आहे.



