Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ‘सावजी खाल तर हॉस्पिटलला जाल’… मुंढेंच्या वक्तव्याने नागपूरकर संतापले; नेमकं काय आहे प्रकरण?
फूड

‘सावजी खाल तर हॉस्पिटलला जाल’… मुंढेंच्या वक्तव्याने नागपूरकर संतापले; नेमकं काय आहे प्रकरण?

Tukaram Mundhe

Tukaram Mundhe Saoji Mutton: तुकाराम मुंढे यांच्या सावजी मटणाबाबतच्या वक्तव्यानंतर नागपूरमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नागपूरकर आणि सावजी हॉटेल चालकांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून, आरोग्याचा मुद्दा आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती यावर चर्चा सुरू झाली आहे.

नागपूरची (Nagpur food) ओळख असलेलं सावजी मटण (Saoji Mutton) आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आले आहे. सावजीसारख्या तेलकट आणि तिखट पदार्थामुळे (spicy food) आरोग्यवर परिणाम होऊ शकतो, असे मत मुंढे यांनी व्यक्त केल्यानंतर नागपूरमधील सावजी हॉटेल चालक ( Saoji hotel owner) आणि खाद्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी त्यांना घरी येऊन सावजी खाण्याचे निमंत्रण दिले, तर काहींनी मानहानीच्या कारवाईचा इशाराही दिला. नेमकं मुंढे काय म्हणाले? सावजी मटण खरंच आरोग्यासाठी धोकादायक आहे का? आणि नागपूरकरांसाठी सावजी इतकं खास का आहे? जाणून घेऊया.

हेही वाचा: इडलीला बाय-बाय म्हणा! सकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी ‘रागी मुद्दा’; सोपी आहे रेसिपी

मुंढेंच्या वक्तव्याने वादाला सुरुवात

अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना तुकाराम मुंढे यांनी आरोग्य आणि आहाराच्या सवयींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सावजीसारख्या तेलकट पदार्थांचा उल्लेख करत, अशा प्रकारचे अन्न नियमित खाल्ल्यास हृदय आणि आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात, असे सांगितले.

मुंढे यांच्या या वक्तव्यानंतर नागपूरमध्ये प्रतिक्रिया उमटू लागल्या. कारण सावजी ही केवळ एक खाद्यपदार्थाची डिश नसून नागपूरच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग मानली जाते.

सावजी हॉटेल चालकांचा आक्षेप

मुंढे यांच्या वक्तव्यावर सावजी हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सावजी हॉटेल्स असून हजारो लोक दररोज हा पदार्थ खातात. जर सावजी इतकाच घातक असता, तर त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसले असते, असा सवाल काही हॉटेल चालकांनी उपस्थित केला.

काहींनी तुकाराम मुंढे यांना थेट आव्हान देत, “आमच्या घरी या, स्वतः बनवून सावजी खाऊ घालतो,” असे म्हटले. तर काहींनी सावजीच्या प्रतिमेला धक्का पोहोचवल्याचा आरोप करत कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला.

नागपूरची ओळख असलेली सावजी परंपरा

नागपूरमधील सावजी पाककृतीला अनेक दशकांची परंपरा आहे. हलबा-कोष्टी समाजाच्या पारंपरिक स्वयंपाकातून ही चव पुढे आली असल्याचे सांगितले जाते.

सावजी मसाल्यामध्ये सुकी लाल मिरची, धने, जिरे, लवंग, दालचिनी, खसखस आणि सुक्या खोबऱ्यासारख्या घटकांचा वापर केला जातो. हे मसाले भाजून त्याची खास पद्धतीने पूड केली जाते.

यानंतर या मसाल्यात मटण, चिकन, खिमा, कलेजी यांसह काही शाकाहारी पदार्थही तयार केले जातात. झणझणीत चव, काळसर रंग आणि खास मसाल्याची ओळख यामुळे सावजीला वेगळी लोकप्रियता मिळाली आहे.

आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?

आहार तज्ज्ञांच्या मते, सावजीमध्ये वापरले जाणारे अनेक मसाले आरोग्यासाठी उपयुक्त असू शकतात. मात्र, या पदार्थात तेल आणि तिखटाचे प्रमाण जास्त असल्यास त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.

विशेषतः हृदयरोग, रक्तदाब किंवा पचनाशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी अशा पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

मूळ सावजी आणि बदललेली चव यातील फरक

या वादातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पारंपरिक सावजी आणि बाजारात मिळणाऱ्या काही बदललेल्या प्रकारांमधील फरक.

काही ठिकाणी सावजीच्या नावाखाली अतिरिक्त तेल, तिखट आणि कृत्रिम चव वाढवणाऱ्या घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र, पारंपरिक पद्धतीने तयार केलेली सावजी योग्य प्रमाणात खाल्ल्यास ती फक्त चवीचा भाग राहते.

वाद नेमका कुठे आहे?

तुकाराम मुंढे यांचा मुद्दा आरोग्याशी संबंधित सवयींबाबत होता, तर नागपूरकरांचा आक्षेप सावजी या पारंपरिक खाद्यसंस्कृतीला धक्का बसल्याबद्दल आहे.

एकीकडे आरोग्यासाठी तेल आणि तिखटाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो, तर दुसरीकडे सावजीसारख्या पारंपरिक पदार्थाला बदनाम करू नये, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

सध्या हा वाद “आरोग्य की खाद्यसंस्कृती?” या मुद्द्यावर केंद्रित झाला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते कोणताही पदार्थ प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ला तर तो आनंदाचा भाग ठरू शकतो.

तुम्हाला काय वाटतं? सावजी मटण खरंच आरोग्यासाठी धोकादायक आहे की हा फक्त गैरसमज आहे? आपलं मत नक्की सांगा.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts