Nandigram Bypoll 2026: नंदीग्राम पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या संचिता प्रधान यांनी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा नंदीग्राम चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. तृणमूल काँग्रेसने नंदीग्राम पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिलेल्या संचिता प्रधान यांनी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता त्यांनी थेट शुभेंदू अधिकारी यांची भेट घेतल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी (१८ सप्टेंबर) संचिता प्रधान नबान्न येथील संचिवालयात पोहोचल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्याशी भेट घेतली. या भेटीमागचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही. मात्र, या भेटीमुळे नंदिग्रामाच्या पोटनिवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना वेग आला आहे.
हेही वाचा: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! २५ हजारांची वेतनमर्यादा लागू; EDLI विम्याबाबत नवी काय अपडेट?
काही दिवसांपूर्वीच मिळाली होती उमेदवारी
नंदीग्राम मतदारसंघासाठी तृणमूल काँग्रेसकडून संचिता प्रधान यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे त्या निवडणुकीच्या तयारीला लागल्या असतानाच शुभेंदू अधिकारी यांची भेट घेतल्याने हा विषय आता राजकीय चर्चेचा मुद्दा बनला आहे.
या भेटीनंतर संचिता प्रधान भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, याबाबत संचिता प्रधान किंवा भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
नंदीग्रामचा जुना राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत
नंदीग्रामचा उल्लेख झाला की ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांच्यातील २०२१ची निवडणूक आठवते. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी स्वतः नंदीग्राममधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता.
यानंतर शुभेंदू अधिकारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले. २०२६च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी नंदीग्राममधून विजय मिळवला. भवानीपूरमधूनही विजयी झाल्यानंतर त्यांनी नंदीग्रामची जागा सोडली. त्यामुळे या जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे.
भाजपकडून कोणाला संधी?
नंदीग्रामच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने हसिराणी रथ यांना उमेदवारी दिली आहे. त्या शुभेंदू अधिकारी यांचे माजी पीए चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. निवडणुकीचा निकाल आल्यानंतर काही काळातच चंद्रनाथ रथ यांची हत्या झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, ऋतब्रत गटाकडून मोहम्मद एतेशामुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून मिलन प्रधान, तर सीपीआयकडून गोपाल गिरी निवडणुकीच्या मैदानात आहेत.
निकाल कधी आहे?
नंदीग्राम पोटनिवडणुकीसाठी ६ ऑक्टोबरला मतदान होणार असून ९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. १६ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती.
टीएमसीच्या चिन्हावरूनही वाद
नंदीग्रामच्या पोटनिवडणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. पक्षातील दोन गटांकडून मूळ टीएमसीवर दावा केला जात आहे.
ऋतब्रत बॅनर्जी गटाने आपल्याकडे अधिक आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या गटाकडूनही संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचे सांगण्यात आले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने टीएमसीच्या निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेतला आहे.
आता संचिता प्रधान आणि शुभेंदू अधिकारी यांची भेट नेमका कोणता राजकीय संदेश देते, याकडे पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.









