Ahmednagar College Student Protest: अहमदनगरच्या आडसूळ टेक्निकल कॅम्पसविरोधात MCA विद्यार्थी प्रशांत साळवे यांचा आरोप आहे. मूळ कागदपत्रे परत न मिळाल्याने २८ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा करण्यात आला आहे.
महाविद्यालयाने प्रवेश रद्द करण्यास नकार देत आपली मूळ शैक्षणिक कागदपत्रे परत केली नसल्याचा आरोप करत एका विद्यार्थ्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. अहमदनगर तालुक्यातील आडसूळ टेक्निकल कॅम्पसच्या (Ahmednagar College Student Protest) कारभाराविरोधात MCAच्या विद्यार्थ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत न्याय मिळण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून तातडीने हस्तक्षेप न झाल्यास २८ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा विद्यार्थ्याने (MCA Student) दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
गणेशवाडी, ता. नेवासा येथील प्रशांत दशरथ साळवे यांनी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून आडसूळ टेक्निकल कॅम्पसमध्ये MCA प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला होता. प्रवेशावेळी त्यांनी आवश्यक असलेली मूळ शैक्षणिक कागदपत्रे महाविद्यालयात जमा केल्याचे त्यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रशांत साळवे हे अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थी असून, जातपडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती यामुळे त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे प्रवेश रद्द करण्याची मागणी
प्रशांत साळवे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले असून सध्या ते आणि त्यांचा मोठा भाऊ असे दोघेच कुटुंबात आहेत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने पुढील शैक्षणिक खर्चाचा भार उचलणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
यामुळे त्यांनी महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश रद्द करून मूळ कागदपत्रे परत देण्याची विनंती केली. ( LS Marathi News )
‘फी भरल्याशिवाय कागदपत्रे मिळणार नाहीत’, असा आरोप
प्रवेश रद्द करण्याची मागणी केल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने प्रवेश रद्द (Aadsul Technical Campus) करण्यास नकार दिल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. तसेच वार्षिक ९० हजार रुपये फी भरून प्रवेश कायम ठेवण्यास सांगण्यात आले आणि फी न भरल्यास मूळ कागदपत्रे परत केली जाणार नाहीत, असा दावा त्यांनी निवेदनात केला आहे.
या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असून, आपली शैक्षणिक कागदपत्रे तातडीने परत मिळावीत, अशी मागणी प्रशांत साळवे यांनी केली आहे.
हेही वाचा:
जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तक्षेपाची मागणी
महाविद्यालयाच्या कारभाराची चौकशी करून विद्यार्थ्याची मूळ कागदपत्रे परत मिळवून द्यावीत, तसेच संबंधित प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणात तातडीने दखल घेऊन तोडगा काढला नाही, तर २८ सप्टेंबर २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशांत साळवे यांनी दिला आहे.
या प्रकरणातील विद्यार्थ्याच्या आरोपांबाबत महाविद्यालय प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाची बाजू समोर आल्यानंतरच संपूर्ण प्रकरणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.



