Maharashtra Weather Update: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. कोकण, मराठवाड्यासह अनेक भागांत ढगांची दाटी आणि जोरदार सरींची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष आता हवामानाच्या पुढील अंदाजाकडे लागले आहे.
Maharashtra Weather Update : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यातील अनेक भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra Rain Latest News) काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनके भागांत पावसाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे खरीप पिकांवर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे काही भागांत अचानक पावसाळा (Maharashtra Rain Forecast) सुरुवात झाली आहे.
हेही वाचा: मंगळ कर्क राशीत दाखल; ‘या’ ६ राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत मिळू शकतात सकारात्मक संकेत
मुंबई आणि पुण्यातही पावसाची हजेरी
मुंबईतील (Mumbai Rain) काही भागांत शुक्रवारी रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. पवई परिसरासह आसपासच्या भागात सकाळच्या वेळी हलका पाऊस सुरू असल्याचे चित्र (Maharashtra Weather Today) पाहायला मिळाले. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पुण्यातील (Pune Rain) काही भागांतही पावसाने हजेरी लावली आहे. पुढील काही तासांत काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वातावरणातील बदलामुळे पावसाला पोषक स्थिती
हवामानातील बदलांमुळे राज्यातील काही भागांत पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरात परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाच्या निरीक्षणात आले आहे. तसेच मराठवाड्यापासून (Marathwada Rain) कर्नाटकाच्या दिशेने अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा विस्तारल्याने काही भागांत पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या काहीसा विस्कळीत झाला असला तरी स्थानिक वातावरणामुळे काही भागांत पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत.
भंडाऱ्यात आठ दिवसांनंतर पावसाचे पुनरागमन
भंडारा जिल्ह्यात तब्बल आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला.
पावसाअभावी शेतकरी चिंतेत होते. मात्र, आता झालेल्या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या धानपिकांना काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. पावसामुळे तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा जाणवत आहे.
विदर्भात अजूनही पावसाची प्रतीक्षा
विदर्भातील (Vidarbha Weather)अनेक भागांत अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही भागांत कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
राज्यातील पावसाचे वितरण सध्या असमान असल्याने काही भागांत पाऊस तर काही ठिकाणी कोरडे वातावरण अशी परिस्थिती कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील हवामान अंदाजाकडे लागले आहे.








