Leopard Attack Rescue : सांगली जिल्ह्यातील शिराळा मधील उपनळे गावात बुधवारी रात्री मृत्यू आणि जिद्दीचा थरार पाहायला मिळाला. घराबाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्याने ९ वर्षीय चिमुकलीवर झडप घालून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, १९ वर्षाच्या भावाने जीवाची पर्वा न करता बहिणीचा पाय पकडून तिला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढलं. भावाच्या या धाडसामुळे आणि आईने केलेल्या आरडाओरडा केल्यामुळे स्वरांजली संग्राम पाटील या चिमुकलीचा प्राण वाचला आहे.
उपवळे येथील हनुमान मंदिराजवळ संग्राम पाटील हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास जेवण आटोपून शिवम आणि स्वरांजली हे दोघे भाऊ-बहीण हातात हात धरून एका घरातून दुसर्या घरात जात होते. दोन्ही घरांच्या मधील बोळीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वरांजलीवर हल्ला केला आणि तिची मान पकडली, आणि तिला फरफटत ओढून नेण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – अति घाई संकटात नेई! तेलंगणात वेगवान अनियंत्रित कार दुभाजकावर आदळली; चार विद्यार्थ्यांचा मृत्यू
स्वरांजलीचा हात शिवमच्या हातातून निसटला..
बिबट्याने स्वरांजलीला ओढण्यास सुरुवात करताच तिचा हात शिवमच्या हातातून सुटला. मात्र, न डगमगता शिवमने तात्काळ स्वरांजलीचे पाय घट्ट पकडून ठेवले आणि तिला मागे ओढू लागला. दरम्यान, मुलांची आई स्वप्नाली यांनीही घटनास्थळी धाव घेत आरडाओरडा सुरू केला. हा कल्लोळ ऐकून नागरिक जमा झाले. त्यानंतर बिबट्याने स्वरांजलीला तिथं सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. सुदैवाने, स्वरांजलीने स्वेटर आणि डोक्याला टोपी घातलेली असल्याने बिबट्याचे दात मानेत खोलवर रुतले नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवमने न घाबरता जी हिम्मत दाखवली त्याला दाद दिली पाहिजे.
स्वरांजलीच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर जखमा
या हल्ल्यात स्वरांजलीच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. तिला कुटुंबियांनी तातडीने शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉ. निलेश पाटील तिच्यावर उपचार करत आहेत. घटनेची माहिती मिळताच वनपाल अनिल वाजे आणि वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
स्वेटर आणि टोपी ठरली ‘सुरक्षा कवच’
तीन वर्षांपूर्वी या गावापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या तडवळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ११ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला होता. उपवळे येथील घटनेने या जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या असून परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वेटर आणि टोपी ठरली ‘सुरक्षा कवच’ थंडीमुळे स्वरांजलीने अंगात जाड स्वेटर आणि डोक्यावर टोपी घातली होती. बिबट्याने तिच्या मानेवर झडप घातली, परंतु टोपी आणि स्वेटरच्या अडथळ्यामुळे बिबट्याची शिकार करण्याची पकड पूर्णपणे बसू शकली नाही.











