Vasai Deep Sea Gas Leak : वसईच्या खोल समुद्रात गेल्या नऊ दिवसांपासून पाण्याच्या पृष्ठभागावर फेस तयार होत असून गोलाकार वर्तुळे दिसून येत असल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार समुद्रतळाशी असलेल्या गॅस किंवा हवेच्या पाईपलाईनमधून दाब बाहेर पडल्यामुळे होत असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
स्थानिक मच्छिमारांना मासेमारीदरम्यान हा असामान्य प्रकार सातत्याने जाणवत आहे. काही ठिकाणी पाण्यावर मोठ्या प्रमाणात फेस साचलेला दिसत असून पाण्याच्या पृष्ठभागावर गोल वर्तुळ निर्माण होत असल्याचेही स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेची माहिती मच्छिमारांनी तात्काळ कोस्ट गार्ड तसेच मत्स्यव्यवसाय विभागाला दिली आहे.
मच्छिमारांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची भीती
मच्छिमारांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी या भागात असा प्रकार कधीच पाहायला मिळाला नव्हता. त्यामुळे समुद्रातील सुरक्षितता, पर्यावरणावर होणारा संभाव्य परिणाम आणि मच्छिमारांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर खरोखरच गॅस गळती होत असेल तर ती गंभीर बाब ठरू शकते, अशी चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा झाला अपघात; रिक्षाचालक जखमी; जाणून घ्या कसा घडला अपघात
समुद्रातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, संबंधित यंत्रणांकडून समुद्रातील परिस्थितीचा अभ्यास करण्यात येत असून तज्ज्ञांच्या मदतीने तपास केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकृत तपास अहवाल येईपर्यंत या घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट होणार नाही. या पार्श्वभूमीवर, वसईच्या खोल समुद्रातील या संशयास्पद घटनेमुळे समुद्रातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाकडून तातडीने ठोस पावले उचलली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सावधगिरी बाळगण्याच्या सूचना
याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी याबाबत सखोल चौकशीची गरज असल्याचे सांगितले असून हि घटना अत्यंत सामान्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच समुद्रतळावरील वायुगळती किंवा पाइपलाइनमधील गळतीचा हा प्रकार असल्याचा अंदाज आहे. या परिसरात जाणारे जहाज आणि मासेमारी नौकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना विवेकानंद कदम यांनी दिल्या आहे.












