सध्याच्या घडीला ज्या सिनेमाने भारतभर धूम उडवली आहे, तो म्हणजे ‘कंतारा’. मात्र,’कांतारा’च्या लढतीत महाराष्ट्राचा महासिनेमा ‘दशावतार’ ने आपला गड उत्कृष्टरित्या राखून ठेवला आहे. ‘कंतारा’च्या बरोबर बॉलीवूड आणि मराठी सिनेश्रुष्टीतील दशावतार हे चित्रपट आले होते. त्यातील बॉलीवूडच्या चित्रपटाला कंताराने धडक दिली असली, तरी ‘दशावतार’ने चौथ्या आठवड्यातही आपले स्थान टिकवून ठेवले आहे. ‘दशावतार’चे चौथ्या आठवड्यातसुद्धा सुमारे दीडशेच्यावर शो तुफान गर्दीत सुरु आहेत. आणि हीच मराठीतील सकस कथेची, अर्थपूर्ण मराठी चित्रपटाची आणि सुजाण मायबाप रसिकांच्या प्रेमाची ताकद आहे.
ओशन फिल्म्सची निर्मिती आणि झी स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या ‘दशावतार’ चित्रपटावर गेले तीन आठवडे थिएटरमध्ये रसिकांच्या प्रेमाचा वर्षाव होत आहे. एवढंच नाही तर परदेशातही मराठीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अमेरिकेतही या मराठी सिनेमाने धुमाकूळ घातला असून शंभरहून जास्त शो होत आहेत, तर ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, आखाती देशातही ‘दशावतार’ने आपला झेंडा फडकवला आहे. त्यामुळे दशावताराच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीत बर्याच काळानंतर असा अद्भुत अविष्कार लोकांना अनुभवायला मिळत आहे.
दशावतारमुळे कोकणातील अनेक बंद चित्रपटगृहांची दारे पुन्हा उघडली गेली आहेत, तर एकट्या ‘दशावतार’वर कोकणातील चित्रपटगृहांनी पूर्ण वर्षभराचे उत्पन्न कमावले आहे. तर जिथे थिएटर नाहीत अशा काही खेड्यांमध्ये कंटेनर थिएटर ‘दशावतार’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या दारात दाखल झाले. या चित्रपटाने लोकांच्या उदंड प्रतिसादासोबतच मराठी चित्रपट, नाटक आणि सामाजिक वर्तुळातही ‘दशावतार’ची खूप प्रशंसा मिळवली. दशावतारमुळे मराठी चित्रपट उद्योगाला आलेली मरगळ झटकून नवचैतन्य आल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
तसेच कोकणातील ज्या दशावतारी कलाप्रकाराचा आधार या चित्रपटात घेतला गेला, ती लोककला आणि दशावतारी कलाकार यांना पुन्हा एक नवचैतन्य मिळवून देण्यासाठी तसेच लोकप्रियता देण्यासाठी हा चित्रपट कारणीभूत ठरतो आहे. तर या चित्रपटाचे आणिकही एक यश म्हणजे, कोकण, गोवा इथवरच मर्यादित असलेल्या दशावतारी नाटकांना पुण्या-मुंबईतून खेळांची मागणी येत आहे.
हे ही वाचा :
“आस्ते कदम..!! राजे येत आहेत!”, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमेचा टिझर प्रकाशित
जनमानसात उभी केली चळवळ
‘दशावतार’ चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसगाजवले नाही, तर जनमानसात एक चळवळ उभी करण्याचं कामही केलं आहे. कोकणातील जमिनी, देवराया, निसर्ग वाचवण्यासाठी कोकणी माणूस आता पुढाकार घेताना दिसत आहे. कोकणातील कातळशिल्पांबाबत, त्याच्या संवर्धनासाठी कोकणी माणूस सजग झाला आहे. नुकताच 27 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीने निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्याशी कातळशिल्पं जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी सामंजस्य करार केला आहे. यामुळे कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचा विकास होणार आहे. मराठी सिनेउद्योग, दशावतारी कला, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाबाबत होत असलेले सकारात्मक बदल हेच ‘दशावतार‘ या चित्रपटाचे फार मोठे यश म्हणावे लागेल.