V Shantaram biopic poster : भारतीय चित्रपट सृष्टीतील नावाजलेले व्यक्तिमत्व, भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले गेमचेंजर व्ही. शांताराम यांचा प्रवास आता रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. त्यांच्यावर बनवण्यात येणाऱ्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्यांच्या या बायोपिकचे पहिले पोस्टर देखील नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.
दिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास या महाकाव्यातून उलगडणार
व्ही. शांताराम राजाराम वणकुंद्रे म्हणजे आपल्या चित्रपटसृष्टीला दिशा देणारे व्ही. शांताराम यांनी चित्रपटसृष्टीला नवीन उमेद, नवीन तत्वज्ञान, नवी सौन्दर्यभाषा दिली आहे. त्यांचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. त्यांच्यावर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले असून त्यांच्या दिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास या महाकाव्यातून उलगडणार आहे.
हे ही वाचा : बिग बॉस मराठी 5 विजेता सूरज चव्हाण अडकला लग्नबंधनात; पत्रिका देऊनही अनेकांनी फिरवली पाठ
व्ही शांताराम हे प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, नट आणि पटकथा लेखक होते. त्यांनी प्रभात फिल्म कंपनी आणि राजकमल कलामंदिर या कंपन्या स्थापन केल्या होत्या. तर दो आँखे बारह हाथ, नवरंग यासारखे अनेक नावाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य संघर्ष, सर्जनशील ध्यास आणि जीवनात बदल घडवण्याच्या इच्छाशक्तीची प्रेरणादायी परंपरा तेवत ठेवली. या संपूर्ण प्रेरणादायी असा जीवन प्रवास आपण मोठ्या पडद्यावर लवकरच अनुभवणार आहोत.
View this post on Instagram
पहिली झलक आली समोर
या महाकाव्याचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले. या पोस्टर मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदी व्ही शांताराम यांच्या भूमिकेत दिसत आहे. सिद्धार्थ चतुर्वेदी याची ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील गेम चेंजर ठरेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन लेखन अभिजीत शिरीष देशपांडे करत आहेत. अभिजित देशपांडे यांनी यापूर्वी डॉ. काशिनाथ घाणेकर या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. आता या चित्रपटाच्या यशानंतर व्ही शांताराम चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ही आजोबांच्या कर्तृत्वाला वाहिलेली एक भव्य श्रद्धांजली
या चित्रपटाची निर्मिती व्ही शांताराम यांचे नातू राहुल किरण शांताराम यांनी केली असून “हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी केवळ प्रोजेक्ट नाही तर ती एक भावना आहे. असे वक्तव्य त्यांनी केले आहे. ते पुढे म्हणतात कि, हा चित्रपट म्हणजे आमच्या सर्वांकडून आजोबांच्या कर्तृत्वाला वाहिलेली एक भव्य श्रद्धांजली आहे. व्ही. शांताराम यांनी भारतीय चित्रपटाला दिलेले योगदान आजच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा आमच्या निर्मितीमागचा मुख्य उद्देश असल्याचंही शांताराम यांचे नातू राहुल किरण शांताराम यांनी सांगितले आहे.












