नाशिक : नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी रात्री एक भीषण अपघात घडला. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) वरुन बिहारच्या रक्सौलला जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून तीन तरुण पडले. या दुर्दैवी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघात कसा घडला? :
प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या पलीकडे ओढा रेल्वे स्थानकाजवळील जेल रोड हनुमान मंदिराजवळील ढिकले नगर परिसरात ही घटना घडली. ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच ओढा रेल्वे स्थानकाचे स्टेशन मॅनेजर आकाश यांनी नाशिक रोड रेल्वे विभागाला माहिती दिली की तीन तरुण ट्रेनमधून पडले आहेत.
दोन तरुण मृत आढळले, तर एक जखमी :
माहिती मिळताच, नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माळी, पोलीस कॉन्स्टेबल भोळे आणि त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. भुसावळला जाणाऱ्या ट्रॅकवर 190/1 आणि 190/3 किमी दरम्यान 30 ते 35 वयोगटातील दोन तरुण मृतावस्थेत आढळले. आणखी एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळला. जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेनं तातडीनं जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं, जिथं त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
गर्दीमुळं अपघात झाल्याची शक्यता :
पोलिसांनी सुरुवातीला असा अंदाज लावला आहे की हा अपघात रेल्वेत जास्त गर्दीमुळं झाला आहे. सध्या, बिहार निवडणुका, दिवाळी आणि विशेषतः छठ सणामुळं, उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते, ज्यामुळं प्रवाशांना ट्रेनच्या दारांवर किंवा फूटबोर्डवर प्रवास करावा लागतो. गर्दी किंवा धडकेमुळं तरुणांचा तोल गेला आणि ते ट्रेनमधून पडले असा संशय आहे. सध्या, मृत आणि जखमींची ओळख पटलेली नाही आणि पोलीस पुढील तपास करत आहेत.