NEET 2026 Re-Exam: नीट पेपर फुटीच्या वादानंतर आज देशभरात NEET-UG 2026 ची पुनर्परीक्षा होत असून २२ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत. यावेळी प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी प्रथमच भारतीय वायुसेनेची मदत घेण्यात आली असून देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
NEET-UG 2026 च्या प्रश्नपत्रिका फुटीच्या वादानंतर आज देशभरात पुन्हा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. देशातील ५६४ शहरांसह परदेशातील केंद्रावरही ही परीक्षा होत असून, एकूण २२.७९ लाखांहून अधिक विद्यार्थी यात सहभागी होत आहेत. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यासाठी यंदा अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा: २०२९ पंतप्रधानपदाच्या चर्चेतून ‘ऑपरेशन टायगर’वर राज ठाकरे यांचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी वायुसेनेची मदत
राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने यंदा प्रथमच भारतीय वायुसेनेची मदत घेतली आहे. प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे विविध राज्यांतील स्ट्राँग रूम आणि परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी वायुसेनेच्या विमानांनी आणि हेलिकॉप्टरांनी २०० हुन अधिक उड्डाणे केली. देशभरात २ लाखांपेक्षा अधिक सुरक्षा कर्मचारी आणि परीक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
ही परीक्षा इंग्रजी, हिंदीसह १२ भारतीय भाषांमध्ये घेतली जात आहे. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेसाठी ३ लाखांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रावर काय घेऊन जावे?
NTA ने विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र, फोटोयुक्त ओळखपत्र आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणण्याचे निर्देश दिले आहेत. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची, वीजपुरवठ्याची, पंख्यांची तसेच पालकांसाठी बाहेर बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
कडक सुरक्षा उपाययोजना
या पुनर्परीक्षेसाठी NTA ने विशेष खबरदारी घेतली आहे. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञांच्या टीमला परीक्षा पूर्ण होईपर्यंत क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
प्रश्नपत्रिका NTA च्या १८ प्रादेशिक केंद्रापर्यंत भारतीय वायुसेना आणि भारतीय टपाल विभागाच्या मदतीने पोहोचवण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रांवर स्थनिक पोलिसांसोबत केंद्रीय सुरक्षा दलांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी (DM) आणि पोलीस अधीक्षक (SP) यांना परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अफवा, गैरप्रचार आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर कमांडोंचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
मॉक ड्रिलद्वारे तयारीची चाचणी
NTA च्या म्हणण्यानुसार, मॉक ड्रिलद्वारे सर्व तयारीची चाचणी घेण्यात आली आहे. परीक्षा देशभरातील 95 हजारांहून अधिक वर्गखोल्यांमध्ये घेतली जाणार आहे. प्रत्येक वर्गात किमान एक CCTV कॅमेरा बसवण्यात आला असून, एकूण 1.38 लाखांहून अधिक CCTV कॅमेरे कार्यरत आहेत.
या कॅमेऱ्यांमधील थेट दृश्यांचे निरीक्षण राष्ट्रीय, राज्य आणि मंत्रालय स्तरावरून ऑनलाइन पद्धतीने केले जाणार आहे. (LS Marathi News Channel)
परीक्षा वेळ आणि प्रवेश
यंदा परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत होणार असून, एकूण कालावधी 3 तास 15 मिनिटांचा असेल.
विद्यार्थ्यांना सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल. दुपारी 1.30 नंतर केंद्राचे प्रवेशद्वार बंद करण्यात येईल आणि त्यानंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
विद्यार्थ्यांनी सोबत काय आणावे?
NTA च्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले प्रवेशपत्र
फोटोयुक्त ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र इ.)
दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
ड्रेस कोड
NTA ने विद्यार्थ्यांना हलक्या रंगाचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट किंवा टी-शर्ट आणि साधी पँट किंवा ट्राउझर परिधान करण्याचा सल्ला दिला आहे. पादत्राणांमध्ये साध्या चप्पल किंवा कमी टाचांच्या सँडलचा वापर करण्यास सांगितले आहे.










