PM Modi Amarnath Yatra 2026 letter: अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात्रेकरूंना उद्देशून एक खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे.
अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात्रेकरूंना उद्देशून एक खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रातून त्यांनी सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतानाच, यात्रेदरम्यान पाच महत्वाचे संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. श्रद्धा, सेवा, स्वच्छता आणि राष्ट्रसेवा या मूल्यांना अधिक बळकटी देण्याचा संदेश त्यांनी या पत्रातून दिला.
हेही वाचा: पुण्यात रात्रभर रिमझिम पाऊस; घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता, पुढील ३ दिवस हवामान विभागाचा रेड अलर्ट
पंतप्रधानांनी म्हटले की, श्री अमरनाथ यात्रा ही केवळ धार्मिक यात्रा नसून भारताच्या अध्यात्मिक परंपरेचे आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दरवर्षी बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी जम्मू- काश्मीरमध्ये पोहोचतात आणि हा अनुभव प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरतो.
त्यांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी जम्मू- काश्मीर प्रशासन, श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड, भारतीय लष्कर, केंद्रीय सुरक्षा दल, जम्मू-काश्मीर पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे विशेष कौतुक केले. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधांसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले.
पंतप्रधानांच्या मते, अमरनाथ यात्रा ही भारताच्या विविधतेतील एकतेचे जिवंत उदाहरण आहे. विविध भाषा, संस्कृती आणि परंपरा जपणारे भाविक एकाच श्रद्धेने या यात्रेत सहभागी होतात. स्थानिक नागरिकांचे आदरातिथ्य, लंगर सेवा आणि स्वयंसेवकांची निस्वार्थ सेवा ही भारतीय संस्कृतीतील ‘सेवा’ भावनेची प्रचीती असल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्राच्या शेवटी पंतप्रधानांनी सर्व यात्रेकरूंना सुरक्षित प्रवासाच्या शुभेच्छा देत, बाबा अमरनाथ यांचा आशीर्वाद सर्वांवर राहावा अशी प्रार्थना व्यक्त केली. तसेच प्रत्येकाने आपल्या कर्तव्यांप्रती निष्ठावान राहून विकसित भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले.
अमरनाथ यात्रेकरूंना पंतप्रधान मोदींचे पाच संकल्प
१. स्वच्छतेचा संकल्प
यात्रेदरम्यान स्वच्छतेचे सर्व नियम पाळावेत आणि संपूर्ण मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा.
२. सुरक्षित प्रवासाचा संकल्प
प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचना, वाहतूक नियम आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. खराब हवामान, थंडी आणि निसरड्या मार्गांबाबत विशेष दक्षता घ्यावी.
३. ‘व्होकल फॉर लोकल’ला प्रोत्साहन
यात्रेदरम्यानच्या एकूण खर्चापैकी किमान १० टक्के रक्कम स्थानिक उत्पादने खरेदी करण्यासाठी वापरावी. त्यामुळे स्थानिक व्यापारी आणि कुटुंबांना आर्थिक आधार मिळेल.
४. पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भाऊ किंवा बहिणीला एक रोपटे भेट द्यावे आणि ‘आईच्या नावाने एक झाड’ या उपक्रमात सहभागी व्हावे.
५. राष्ट्रसेवेचा संकल्प
वर्षभर ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत विकसित भारताच्या उभारणीत सक्रिय योगदान देण्याचा निर्धार करावा.
टीप: पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार त्यांच्या अधिकृत खुल्या पत्रातील आहेत.
बाबा बर्फानी के दर्शन से जुड़ी श्री अमरनाथ यात्रा हमारी आध्यात्मिक परंपरा और सांस्कृतिक एकता का शाश्वत अध्याय है। मेरी कामना है कि शिवभक्तों की यह यात्रा हर तरह से सुरक्षित और मंगलमय हो! इस पावन अवसर पर श्रद्धालुओं के लिए पांच संकल्पों से जुड़ा मेरा यह पत्र… pic.twitter.com/6Bc2Y9tXJC
— Narendra Modi (@narendramodi) July 3, 2026









