Pune Rain Alert: पुणेकरांनो, आज बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर सावध राहा. काल रात्रीपासून शहरात रिमझिम पाऊस सुरू असून पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान विभागाने घाटमाथ्यासह परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
पुणे आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील ३ दिवस घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला असून, ७ जुलैपर्यंत शहरासह जिल्ह्यात हलक्या ते अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे.
काल (गुरुवारी) रात्रीपासून पुणे शहरात अनेक भागांत सतत पाऊस सुरू असून शुक्रवारी सकाळीही पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली असून पाणीटंचाईच्या चिंतेत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला.
हेही वाचा: एक लाख पगार, पण PF कपात फक्त 1,800 रुपये? वाचा काय आहेत नवीन नियम?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
लोणावळ्यात धुक्याची मनमोहक अनुभूती
गेली २-३ दिवस सतत पासून पडल्याने लोणावळ्यातील डोंगररांगा, दऱ्या आणि घाट परिसर दाट धुक्याने वेढला गेला आहे. हिरवाईने नटलेला निसर्ग, धबधबे आणि ढगांमध्ये हरवलेले रस्ते पर्यटनस्थळाचे सौंदर्य खुलून आले आहे. या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे.
सेल्फी आणि रील्सच्या नादात धोकादायक कृत्ये
पर्यटकांच्या वाढत्या गर्दीसोबत काहीजण सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत असल्याचेही दिसून येत आहे. विशेषतः सहारा ब्रिज परिसरातील धबधब्यांजवळ अनेक पर्यटक निसरड्या कड्यांवर चढून सेल्फी आणि व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. सततच्या पावसामुळे खडक आणि पायवाटा अतिशय घसरड्या झाल्या असून, अशा प्रकारचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो.
लोणावळा पोलिसांनी वारंवार सुरक्षित पर्यटनाचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. विकेंडच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने जबाबदारीने पर्यटन करण्याचे आवाहन केले आहे.











