Ketan Agrawal Case: केतन अग्रवाल प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिया आणि चेतन यांच्याशिवाय आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. चला तर जाणून घेऊयात नेमकं कोण आहे ती व्यक्ती.
लोणावळ्यातील केतन अग्रवाल हत्येप्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र या दोघांव्यतिरिक्त या कटात आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा: ‘महायुतीचा प्रस्ताव आल्यास विचार करु’ शरद पवारही सत्तेत जाणार? कोल्हेंनी दिले संकेत
ती व्यक्ती कोण?
पोलिसांना संशय आहे की, सिया आणि चेतन यांच्या कटामागे अखिल एक व्यक्ती असू शकते. त्यामुळे तपासाची दिशा आता या संभाव्य तिसऱ्या व्यक्तीकडे वळली आहे. मात्र ती व्यक्ती कोण, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
या प्रकरणात आतापर्यंत सियाच्या कुटूंबियांसह अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. सियाचा भाऊ, आई- वडील तसेच केतन आणि सियाच्या नात्याशी संबंधित काही मध्यस्थ व्यक्तींचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसेच घटनाक्रमाशी संबंधित काही साक्षीदारांचीही चौकशी पोलिसांनी केली आहे.
केतनच्या मोबाईल डेटा डिलीट
दरम्यान, तपासादरम्यान केतनच्या मोबाईल डेटा डिलीट करण्यात आला असावा. असा पोलिसांचा संशय आहे. मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला असून महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेपूर्वी घडलेल्या गोष्टी
याशिवाय, घटनेपूर्वी आणि नंतर घडलेल्या काही घटनांमुळेही तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. पासपोर्ट गायब होणे, वैयक्तिक वस्तूंमध्ये बदल होणे आणि घटनास्थळी झालेल्या हालचाली यामुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला आहे.
सीन रिक्रिएशन
लोहगड परिसरात पोलिसांनी सीन रिक्रिएशन करून संपूर्ण घटनाक्रम पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींच्या हालचाली, घटनास्थळाची भौगोलिक रचना आणि उपलब्ध पुरावे यांची बारकाईने तपासणी केली जात आहे.
या प्रकरणात अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. खरोखरच आणखी कोणाचा सहभाग आहे का, आणि असल्यास तो कोण, याचा उलगडा पुढील तपासानंतरच होणार आहे. पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली असून लवकरच या प्रकरणात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.










