Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ‘महायुतीचा प्रस्ताव आल्यास विचार करु’ शरद पवारही सत्तेत जाणार? कोल्हेंनी दिले संकेत
राजकारण

‘महायुतीचा प्रस्ताव आल्यास विचार करु’ शरद पवारही सत्तेत जाणार? कोल्हेंनी दिले संकेत

Amol Kolhe

Amol Kolhe: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपात जाणार असल्याची चर्चा आता रंगली आहे

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नव्या राजकीय चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत “अजून कोणतीही ऑफर आलेली नाही; आली तर विचार करेन,” असे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

या विधानामुळे ते भविष्यात महायुती किंवा भाजपमध्ये जाणार का, याविषयी चर्चा रंगू लागली आहे. त्याचबरोबर शरद पवार गटातील काही नेत्यांच्या नाराजीच्या चर्चांनाही उधाण आले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत मोठी राजकीय हालचाल होणार का, भाजपची पुढील रणनीती काय असेल आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: यंदा जुलै 2026 मध्ये येत आहेत दोन पवित्र एकादशी; जाणून घ्या तिथी आणि पूजेची वेळ

ऑपरेशन टायगर सुरु असतानाच मोठा खेळ

ऑपरेशन टायगर सुरु असतानाच आता भाजपने राष्ट्रवादीच्या गोटातून हादरवणारी खबर समोर आलीये, कि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपात जाऊ शकतात, डॉ.अमोल कोल्हे म्हणजे केवळ एक राजकीय नेता नाही, तर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला एक भारदस्त आवाज आहे. नारायणगावच्या मातीत जन्मलेला हा गडी, त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला तो शिवसेनेतून.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरले होते आणि आपल्या धडाकेबाज भाषणांनी त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. पण राजकारणाच्या सारीपाटावर सोंगट्या कधी बदलतील सांगता येत नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर त्यांनी शिवबंधन सोडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

शरद पवारांनी या हिऱ्याला बरोबर ओळखलं

शरद पवारांनी या हिऱ्याला बरोबर ओळखलं आणि थेट शिरूर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरुद्ध मैदानात उतरवलं. अमोल कोल्हेंनीनिवडणूक जिंकली आणि ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते. राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडल्यानंतरही अमोल कोल्हे नक्की कुणासोबत जाणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागले होते. सुरुवातीला काही काळ संभ्रम होता, पण अखेर त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. २०२४ च्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ते पुन्हा शिरूरमधून उभे राहिले आणि महायुतीच्या उमेदवाराला धूळ चारत ते दुसऱ्यांदा खासदार झाले.

पत्रकार परिषदेत नेमकं काय बोले अमोल कोल्हे?

पण आता अचानक असं काय झालं की भाजपच्या आणि महायुतीच्या ऑफरची भाषा करायला लागले? पत्रकार परिषदेत त्यांनी जे विधान केलं, त्याने शरद पवार गटाच्या पायाखालची जमीनच सरकली असेल यात शंका नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की अजून महायुतीकडून कोणतीही ऑफर आलेली नाही, पण जर अशी ऑफर आली, तर राजकारणात कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नसते, त्यामुळे त्यावर विचार नक्की केला जाईल. एवढंच बोलून ते थांबले नाहीत, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासकीय कौशल्याची स्तुती सुद्धा केली.

शरद पवारांची साथ सोडून भाजपात किंवा महायुतीत जाणार का?

आता मूळ मुद्दा असा की, जर खरंच अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडून भाजपात किंवा महायुतीत गेले, तर त्याचे काय तोटे होतील आणि काय राजकारण बदलेल? सगळ्यात मोठा तोटा कोणाला होईल, तर तो म्हणजे स्वतः अमोल कोल्हे यांच्या प्रतिमेला. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना पडद्यावर संभाजी महाराजांच्या रूपात पाहिलंय, ज्याने स्वाभिमानासाठी प्राणांची आहुती दिली. अमोल कोल्हे संसदेत बोलताना सुद्धा याच स्वाभिमानाचा आणि निष्ठावंतांचा हवाला देत असतात. त्यांनी यापूर्वी अनेकदा भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणांवर आणि केंद्रीय सत्तेवर कडाडून टीका केलीये. आता जर तेच कोल्हे सत्तेच्या किंवा पदाच्या आमिषाने त्याच भाजपात गेले, तर जनतेच्या नजरेत त्यांची ही प्रतिमा पार धुळीला मिळेल.

जर गेले तर काय होईल?

लोक म्हणतील की पडद्यावरचा स्वाभिमान फक्त डायलॉग पुरताच होता का? यामुळे त्यांच्या नैतिकतेला मोठा धक्का बसेल आणि मतदार त्यांच्यावर गद्दार किंवा संधीसाधू असा शिक्का मारतील. दुसरा मोठा फटका बसेल तो शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. सध्याच्या घडीला अमोल कोल्हे हे शरद पवारांच्या बाजूने लढणारे आणि तरुणांना आकर्षित करणारे सर्वात मोठे वक्ते आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांची स्वतःची अशी मोठी पकड आहे. जर तेच पक्षातून बाहेर पडले, तर पुणे जिल्ह्यात आणि विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाची ताकद निम्मी होईल. कारण तिथले स्थानिक कार्यकर्ते आणि मतदार हे कोल्हेंच्या चेहऱ्याकडे बघून पक्षाशी जोडले गेले आहेत. हा गडी गेला की मागून कार्यकर्त्यांची मोठी फौज सुद्धा भाजपच्या गोटात सामील होऊ शकते, ज्यामुळे शरद पवारांना त्या भागात नव्याने नेतृत्व उभे करण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल.

कोल्हेंना मिळणारे स्थान

तिसरा तोटा म्हणजे महायुतीत किंवा भाजपात गेल्यानंतर कोल्हेंना मिळणारे स्थान. सध्या ते शरद पवारांच्या पक्षात राष्ट्रीय पातळीवरचे नेते आणि मुख्य वक्ते म्हणून मिरवतात. पण भाजपात आधीच नेत्यांची आणि खासदारांची मोठी गर्दी आहे. तिथं गेल्यावर त्यांना हवं तसं स्वातंत्र्य आणि महत्त्व मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे. जर कोल्हे महायुतीत गेले, तर स्थानिक पातळीवर अंतर्गत धुसफूस आणि गटबाजी प्रचंड वाढेल. भाजपच्या आणि महायुतीच्या जुन्या कार्यकर्त्यांना हा बाहेरून आलेला नेता सहजासहजी पचनी पडणार नाही, ज्यामुळे मतदारसंघात कलह निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा: ‘देहविक्री करणाऱ्यांना…’ गिऱ्हाईक फोडणाऱ्यांची राज ठाकरे यांनी वेश्यांशी केली तुलना

अमोल कोल्हेंनी दिला मित्रपक्षांना सूचक इशारा

पण या सगळ्या नाण्याच्या दोन बाजू असतात. राजकारणात कोणतीही चाल विनाकारण खेळली जात नाही. अमोल कोल्हेंनी हे विधान करून एक प्रकारे आपल्याच पक्षाला आणि मित्रपक्षांना सूचक इशारा दिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून किंवा पक्षात आपल्याला मिळणाऱ्या अवाजवी महत्त्वावरून जर ते कुठेतरी नाराज असतील, तर आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी त्यांनी हे ऑफरचं कार्ड बाहेर काढलं असू शकतं.

चतुर राजकीय डाव देखील असू शकतो

मी अजूनही मार्केटमध्ये हिट आहे आणि मला दुसऱ्या बाजूने पण मागणी आहे, हे दाखवून देण्याचा हा एक चतुर राजकीय डाव देखील असू शकतो. शेवटी इतकंच म्हणता येईल की, महाराष्ट्राचं राजकारण आता एवढं रंजक आणि अनपेक्षित झालंय की इथं सकाळी शपथविधी होतो आणि दुपारी सरकार बदलतं. अमोल कोल्हेंनी फक्त एक ठिणगी टाकलीये, आता या ठिणगीचा वणवा पेटतो की ही नुसतीच हवेत सोडलेली वाळूची कणसं आहेत, हे येणारा काळच ठरवेल. पण जर हा निर्णय प्रत्यक्षात आला, तर मात्र महाराष्ट्राच्या मातीत निष्ठेच्या आणि स्वाभिमानाच्या व्याख्या पुन्हा एकदा बदलाव्या लागतील, हे मात्र नक्की.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts