Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यलयातील सचिवापासून थेट निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्त पदापर्यंत मजल मारली…त्यांचा प्रशासकीय सेवेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार मिळाला आणि त्यानंतर ते थेट मुख्य आयुक्त बनले…यानंतर त्यांनी आपला मनमानी कारभार सुरू केल्याचा आरोप आहे…कोट्यवधी लोकांना त्यांनी मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवल्याचा आरोप आहे…यावरून देभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे…तर ठाकरे बंधूनी आक्रमक होत 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत आंदोलन करण्याचं ठरवलंय…युवक काँग्रेस सध्या देशभरात आंदोलन करताना दिसत आहे…तर सीजेपी जंतरमंतरसह देशभरात आंदोलन करणार आहे…पण या आंदोलनाने ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होणार आहे का? या आंदोलनाचा काही परिणाम होईल का?
4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मुंबईत संयुक्त मोर्चा ( Thackeray Brothers )
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धती आणि कथित एकतर्फी निर्णयांविरोधात सध्या संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट आहे… केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद आणि हुकूमशाही कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर विरोधी पक्षांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलाय…‘SIR’ च्या नावाखाली झालेल्या कथित मोठ्या गैरव्यवहाराविरोधात आणि लाखो मतदारांची नावे गायब केल्याच्या निषेधार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकत्रित येईन मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय…
येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत ठाकरे बंधूंच्या संयुक्त पुढाकाराने आणि नेतृत्वाखाली एक भव्य जनमोर्चा काढण्यात येणार असून, या एकाच घोषणेने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे… देशात एकीकडे काँग्रेसने संसदेपासून रस्त्यापर्यंत मोठे आंदोलन छेडले असताना, तर दूसरीकडे ‘कॉकरोच जनता पार्टी’ने दिल्लीच्या जंतरमंतरवर आणि देशात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय… मात्र, या संपूर्ण देशव्यापी रणसंग्रामाचा मुख्य केंद्रबिंदू आता देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि ‘ठाकरे बंधू’ बनले आहेत…. लोकशाही आणि देशाचे संविधान धोक्यात आल्याची हाक देत ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे ठरवल्याने आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे….
ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर नेमके आक्षेप काय? ( Gyanesh Kumar )
पत्रकार रितीका चोपडा यांनी निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार उघड केला आणि देशभरात जणू भूंकपच आलाय…अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोगाचे इतर दोन आयुक्त असलेल्या सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांना संपूर्णपणे अंधारात ठेवून अनेक महत्त्वाचे आणि वादग्रस्त निर्णय एकतर्फी घेतले होते…. या दोन्ही आयुक्तांनी गेल्या 10 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 14 वेळा ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आणि निर्णयांवर अत्यंत तीव्र शब्दांत लेखी आक्षेप नोंदवले होते… परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले… मतदार याद्यांमधून मोठ्या प्रमाणावर ठराविक मतदारांची नावे वगळणे, नवीन मतदारांची नावनोंदणी जाणीवपूर्वक रोखून धरणे आणि निवडणूक आयोगाच्या फॉर्म क्रमांक 6 मध्ये कायदेशीर प्रक्रिया न पाळता एकतर्फी बदल करणे यांसारख्या अत्यंत संवेदनशील बाबींचा या आक्षेपांमध्ये समावेश होता…
संपूर्ण देशातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून मिळून तब्बल १३ कोटी मतदारांची नावे अत्यंत संशयास्पद रित्या मतदार यादीतून हटवण्यात आल्याचा धक्कादायक आरोप आहे…हा केवळ निवडणूक आयोगाचा अंतर्गत प्रशासकीय वाद नसून, आगामी सर्व निवडणुकांवर थेट प्रभाव टाकण्यासाठी आणि सत्ताधारी भाजपला अनुचित फायदा पोहोचवण्यासाठी रचलेला हा एक पूर्वनियोजित आणि मोठा कट असल्याचा घणाघाती आरोप विरोधकांनी केलाय…
ठाकरे बंधूंच्या मोर्चाचा नेमका उद्देश काय? ( Thackeray Brothers Morcha )
ठाकरे बंधूनी आंदोलन करण्याची माहिती देत एक ट्विट केलं आहे…देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे, त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे… या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल, यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत…अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा…बाकी मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल… तेंव्हा एसआयआरविरोधातील या जन मोर्च्यात भेटूया !…या , देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या !
राज ठाकरे – उद्धव ठाकरे, असं ट्वीट मनसेकडून करण्यात आलंय…
आता मनसे आणि ठाकरे गटासह इतर पक्षांनी आणि सीजेपीने जरी आंदोलन करण्याचं ठरवलं तरीही ते ज्ञानेश कुमार यांना हटवू शकत नाही…ज्ञानेश कुमार यांना जर पदावरून हटवायचं असेल तर भारताच्या राज्यघटनेनुसार,त्यांच्या विरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन-तृतीयांश विशेष बहुमताने महाभियोग प्रस्ताव मंजूर करावा लागेल… संसदेच्या या मंजुरीनंतर अंतिम आदेशासाठी हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवला जातो…यानंतर त्यांना हटवल्या जाऊ शकते…तसंच मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवायचं असेल तर सुप्रीम कोर्ट एका जनहित याचिकेवर सुनावणी करत त्यांच्या कामावर कायदेशीर स्थिगिती आणू शकतं…किंवा ज्ञानेश कुमार स्वतःहून राजीनामा देऊन या पदापासून दूर होऊ शकतात…पण असं घडणं तर सध्या अवघड दिसत आहे…कारण विरोधकांचं सभागृहात एवढं संख्याबळ नाही आणि ज्ञानेश कुमार स्वतःहून काही राजीनामा देणार नाही…









