Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • जरांगे पाटलांच्या स्वागताचे बॅनर फाडले; मराठा समाज आक्रमक, कराडमध्ये रास्ता रोको
राजकारण

जरांगे पाटलांच्या स्वागताचे बॅनर फाडले; मराठा समाज आक्रमक, कराडमध्ये रास्ता रोको

Manoj Jarange Patil
47
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडल्याने कराड तालुक्यात मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर फाडल्याने कराड (Karad protest) तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी सकाळी शामगाव घाट ते मसूर मार्गावर लावण्यात आलेल्या काही बॅनरची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याचे समोर आल्यानंतर मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले.

हेही वाचा: ‘महिलांच्या आरोग्याशी तडजोड नको’; लक्ष्मी योजनेतील 3 मुलांच्या मर्यादेवर रेखा गुप्ता काय म्हणाल्या?

कराड तालुक्यात दौरा

मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवारी कराड तालुक्यात दौरा असून, मसूर आणि पाचवड फाटा येथे त्यांच्या बैठका नियोजित आहेत. तसेच कराडमध्ये ते मुक्कामी राहणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी परिसरातील विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते.

मात्र, यापैकी काही बॅनर फाडण्यात आल्याचे सकाळी निदर्शनास आले. या प्रकाराची माहिती मिळताच मराठा समाजातील कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने एकत्र आले. संतप्त कार्यकर्त्यांनी मल्हारपेठ-पंढरपूर मार्गासह कराडच्या दिशेने जाणाऱ्या शामगाव घाटातील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

पोलिसांची घटनास्थळी धाव

आंदोलनाची माहिती मिळताच मसूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करत रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. पोलिसांच्या आश्वासनानंतर काही वेळाने आंदोलन मागे घेण्यात आले.

मात्र, बॅनर फाडणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. यासाठी मराठा समाजातील (Maratha reservation) काही कार्यकर्ते मसूर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू

बॅनर फाडण्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे कराड तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून परिसरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts