सध्या राज्यात नवरात्रौत्सवाची धूम असून सगळीकडे आनंद,चैतन्य आणि गरब्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी गरब्याची मोकळ्या मैदानांसह गरब्यासाठी विशेष हॉलसुद्धा बुक केले जात असून तरुणाईचा यामध्ये मोठा सहभाग पाहायला मिळत आहे. मात्र, यावेळी अनेकदा पोलिसांकडून घालून दिलेल्ल्या नियमांचे उल्लंघन केले जाते. असाच काहीसा प्रकार पुण्यातून समोर आला असून भाजपच्या पुण्यातील खासदार मेधा कुलकर्णी या मुद्यांवरून प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील एक गरबा कार्यक्रम रंगात आला असतानाच मेधा कुलकर्णी यांनी थेट धाड टाकत हा कार्यक्रम बंद पाडला. यावेळी, गरब्याच्या कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा आरोप करत मेधा कुलकर्णी यांनी गरब्याचा कार्यक्रम बंद पाडला. तसेच,’आवाजाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कार्यक्रमांवर आजवर कोणती कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आपण कार्यक्रमात येत हा गरबा बंद पडला‘, असं खासदार मेधा कुलकर्णी यावेळी म्हणाल्या.
नेमकं काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी?
यावेळी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या,’दरवर्षी या ठिकाणी धिंगाणा होत असल्यामुळे इथल्या नागरिकांना खूप त्रास होतो. आताही मला अनेकांचे फोन आले, मी इतर ठिकाणी आरती करायला गेले होते, तेव्हाही मला काही लोकांनी व्हिडीओ पाठवले. परिसरात लिव्हर, कॅन्सर झालेले पेशन्ट आहे. एक 90 वर्षांची महिला आहे. हे सगळ्यांनी कसं सहन करायचं? दरवर्षी इथे दहीहंडी होते. तरी सुद्धा घरातील आजी असेल, आजोबा असतील, लहान मुलं असतील, त्यांना त्रास सहन करावा लागतोय. आवाजाची मर्यादा न पाळल्याने हा कार्यक्रम इथून पुढे जीत ग्राऊंडवर होणार नाही. आवाजाची आणि धार्मिकतेची बंधन ओलांडली आहेत. त्यामुळे या पुढे या मैदानात असे कार्यक्रमात होऊ देणार नाही’, असं मेधा कुलकर्णी यांनी यावेळी ठणकावून सांगितल.
या संदर्भात या पूर्वी देखील आम्ही पोलिसांना फोन केला, डीसीपी कदम यांना फोन केला, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना देखील फोन केलाय. तरी आवाज पाळण्यासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्हला सनदशीर मार्गाने हे करावं वाटलं. त्यामुळे इथून पुढे हा कार्यक्रम इथे होणार नाही”, असेही खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं.