नागपूर : आंतरवली सराटी इथल्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. मात्र आंदोलकांवर करण्यात आलेल्या पोलिसांच्या लाठीमारानंतर राज्यभर संताप उसळला. त्यानंतरच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनानं उचल खाल्ली. आता मात्र आंतरवली सराटी इथं झालेल्या दगडफेकीबाबत छगन भुजबळ यांनी मोठा आरोप केला आहे. पोलिसांवर करण्यात आलेल्या दगडफेकीत शरद पवार यांच्या पक्षातील आमदाराचा हात होता, असा खळबळजनक आरोप छगन भुजबळ यांनी केला. अगोदरच्या रात्रीच आंतरवलीत दगडं आणून ठेवण्यात आले होते, असा दावाही छगन भुजबळ यांनी यावेळी केला.
शरद पवार पक्षाच्या आमदाराचा दगडफेकीमागे हात
छगन भुजबळ यांनी आंतरवली सराटी इथं झालेल्या दगडफेकीत शरद पवार यांच्या आमदारांचा हात असल्याचा आरोप गुरुवारी केला. यावेळी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या पक्षावर गंभीर आरोप केले. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नागपूर इथं चिंतन बैठक सुरू आहे. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ हे आले असता, त्यांना याबाबत विचारणा केली. यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा बुधवारी केलेल्या आरोपावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, “शरद पवार गटाचे आमदार असा शब्द मी वापरला होता. त्यांना मी घरी बसवलं असंही पुढं बोललो. मी शरद पवार यांना सांगितलं होतं. 84 पोलीस आणि महिला जखमी झाल्या परंतु त्यांना एकतर्फी सांगण्यात आलं. त्यामुळे शरद पवार हे पाहणी करण्यास गेले. तो आमदार कोण आहे, शोधून काढा. कोणाला घरी बसवलं हे तुम्हाला माहीत आहे. बापूराव वाडेकर यांनी सांगितलं, रात्री दोन वाजता मिटींग झाली आणि रात्री दगड जमवण्यात आले. ते सकाळी पोलिसांवर हल्ला करण्यासाठी वापरले. मात्र शरद पवार यांना सांगितलं लोकांना मारलं, महिलांना मारलं. त्यामुळे शरद पवार गेले. 84 जणं हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यापूर्वी मनोज जरांगेंनी अनेकदा उपोषण केलं, पण कोणी गेलं नव्हतं. मनोज जरांगे लक्ष, समर्थन करणाऱ्यांना धडा कसा शिकवायचा याचा काय अर्थ काढायचा, ते ओबीसीचे लोक काढतील. समता परिषद रस्त्यावर उतरणार,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जुनीच शोधलेली प्रमाणपत्र दिली
मराठा आंदोलकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली, याबाबत छगन भुजबळ यांना यावेळी माध्यमांनी त्यांना विचारलं असता, त्यांनी भाष्य केलं. याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “जुनीच शोधलेली प्रमाणपत्रं दिली आहेत. पाच ते सहा रिट याचिका दाखल झालेल्या आहेत. नाभिक समाजातर्फे याचिका दाखल झालेली आहे. ओबीसी जात नाही, तर हा समूह आहे. ओबीसीत 374 जातींवर परिणाम होणार आहे. जातीनियोजन संस्था आहे, त्यांच्या नावानं आम्ही रिट याचिका केल्या आहेत. सोमवारी रिट याचिका दाखल झाल्यानंतर उत्तर मागवणार. मात्र महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल यांनी राजीनामा दिल्यामुळे कोण उत्तर देणार असाही प्रश्न आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बैठक बोलावली आहे. याबाबत त्यांना विचारलं असता, “त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीबद्दल मला माहीत नाही. आम्हाला त्यांनी बोलावलं तर आम्ही जाऊ. शब्दा-शब्दांचा काय अर्थ आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलं कळते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीमुळे बॅकलॉग भरला जात आहे.”