BJP clean sweep victory : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे. या ठिकाणी असलेल्या १८ पैकी १८ जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत गटाचे सर्व उमेदवार विजयी झाले असून, विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या गटाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा सफसेल पराभव झाला. या ठिकाणी असलेल्या १८ जागांपैकी १६ जागांवर निवडणूक झाली होती. निवडणूकीच्या आधीच भाजपच्या २ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर आज निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये १६ जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला. हा निकाल हाती येताच माजी आमदार राजेंद्र राऊत गटाच्या कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत फटाके फोडत जल्लोष करण्यात येत आहे.
हेही वाचा – विरोधकांनी पत्रकार परिषद घेत सरकारची कुंडलीच मांडली…
राजू भाऊंना ताकद देणं गरजेचं, ही जनतेची भावना – राजेंद्र राऊत
या घवघवीत विजयानंतर ज्याच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली होती त्या माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी माध्यामांना प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हटले, ‘विधानसभेतील पराभवानंतर जनतेमध्ये ही भावना होती की, राजू भाऊंना ताकद देणं गरजेचं आहे. थांबलेला विकास पुन्हा सुरू करण्यासाठी हे जनतेनं दिलेलं आशीर्वाद आहेत. ही निवडणूक प्रतिष्ठेची नसून जनतेच्या सेवेची लढाई होती. मी कधीही माझी प्रतिष्ठा पणाला लागली म्हणणार नाही किंवा अस्तित्वाची लढाई म्हणणार नाही. ही माझ्या बार्शी तालुक्यातील जनतेची निवडणूक होती, जी मला सेवा करायची त्याची लढाई आहे.’
सोसायटी, ग्रामपंचायत, आणि व्यापारी बांधवांनी सहकार्य केलं – राऊत
‘या विजयाचे श्रेय मतदारांना जाते. बाजार समितीची ही निवडणूक सहकार क्षेत्रातील कठीण परीक्षा होती. सोसायटी, ग्रामपंचायत, आणि व्यापारी बांधवांनी सहकार्य केले. हमाल-तोलार मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली. या ताकतीच्या जीवावरती आज १८ पैकी १८ उमेदवार या ठिकाणी निवडून आले आहेत. आता आम्ही बार्शीच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत,’ असं राजेंद्र राऊत म्हणाले.












