Nasreen Bano Sheikh is the Mayor of Malegaon : महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता महापौर पदाच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अखेर सेक्युलर फ्रंटच्या नसरीन बानो शेख यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार लता घोडके यांचा २५ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. त्यामुळे मालेगावच्या महापौर होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. मात्र, या निवडणूकीत भाजपने शिंदे सेनेला तोंडघशी पाडल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा – खाजगीकरणाच्या लाटेत केज जि.प. शाळा इतिहास जमा! प्रमोद महाजन, बजरंग सोनवणेंनी घेतले शिक्षण
निवडणुकीतील मतांचे समीकरण
या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मालेगाव महापालिका महापौर निवडणुकीत नसरीन बानो शेख यांना एकूण ४३ मते मिळाली. ८४ नगरसेवक असलेल्या या पालिकेत बहुमतासाठी ४३ नगरसेवकांची आवश्यकता होती ती बानो यांना मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिदें सेनेच्या उमेदवार लता घोडके यांना केवळ १८ मतांवर समाधान मानावे लागले. नसरीन बानो यांच्या विजयात इस्लाम पक्षाच्या ३५ नगरसेवकांची मोठी ताकद पाठीशी उभी राहिली. याशिवाय समाजवादी पार्टीच्या ५ आणि काँग्रेसच्या ३ नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड झाले.
भाजप आणि एमआयएमची तटस्थ भूमिका
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि एमआयएम (MIM) या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी घेतलेली तटस्थ भूमिका. या दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी मतदानात सहभाग न घेतल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांची संख्या मर्यादित राहिली. राजकीय विश्लेषकांच्या मते या तटस्थतेचा थेट फायदा नसरीन बानो यांना झाला. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.
‘सेक्युलर फ्रंट’ आणि ‘इस्लाम’ पक्षाकडून गुलालाची उधळण
महापौरपदासाठी एकूण तीन उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले होते, परंतु प्रत्यक्ष लढत ही नसरीन बानो आणि लता घोडके यांच्यातच रंगली. पीठासीन अधिकाऱ्यांनी नसरीन बानो यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करताच महानगरपालिका सभागृहात एकच जल्लोष करण्यात आला. ‘सेक्युलर फ्रंट’ आणि ‘इस्लाम’ पक्षाच्या नगरसेवकांनी गुलालाची उधळण करत आणि जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या विजयामुळे मालेगावच्या स्थानिक राजकारणात सेक्युलर फ्रंटने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.












