Narrow Margin Election Wins : यंदा महापालिकेची निवडणूक एकदम लक्षवेधी ठरली आहे. काल हाती आलेले निकाल देखील तेवढेच धक्कादायक आणि भूवया उंचवणारे होते. राज्यातील काही महापालिकेतील कमी फरकाने निवडून आलेल्या उमेदवारांचा थोडक्यात आढावा घेऊया..
परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार व्यकंट लक्ष्मणराव डहाळे यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार प्रसाद नागरे यांचा केवळ एका मताने पराभव केला आहे. त्यामुळे या विजयाची संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अखिल तरन्नुम यांचा ५४ मतांनी विजय झाला. प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचे अद्वैत सांगळे हे ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. सुनिल जाधव यांच्याविरोधात केवळ 61 मतांनी जिंकले. प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शेख रईस हे १९ मतांनी विजयी झाले आहेत तर शिंदे सेनेच्या निर्मला गव्हाणे पराभूत झाल्या.
हेही वाचा – मीरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता; 78 जागांवर घवघवीत विजय
मुंबईत वांद्रे पूर्व मधील प्रभाग ९० मधील चुरशीच्या आणि तिरंगी लढतीकडे मुंबईकरांचे लक्ष लागलं होतं. ही लढत अत्यंत अटीतटीची ठरली आणि त्यात केवळ ७ मतांनी काँग्रेस उमेदवार ट्युलिप मिरांडा विजयी झाल्या.
भिवंडी महापालिकेत बोलबाला
भिवंडी महापालिकेत प्रभाग ६ ब मध्ये भिवंडी विकास आघाडीच्या रिशिका राका यांचा केवळ २७ मतांनी विजय झाला आहे तर प्रभाग ६ अ मध्येच भाजचे वैभव भोईर यांचा ९८ मतांनी विजय झाला आहे. प्रभाग ७ क मध्ये काँग्रेसच्या रेश्मा अन्सारी ७४ मतांनी विजयी झाल्या आहेत. प्रभाग २२ क मध्ये अपक्ष उमेदवार नितेश ऐनकर हे २१ मतांनी विजयी झाले आहे.
पुण्यात काँटे की टक्कर
पुणे महापालिकेत प्रभाग क्रमांक १७ अ मध्ये भाजपचे खंडू लोंढे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अशोक कांबळे यांच्यात काटे की टक्कर झाली यात लोंढेंचा ५५ मतांनी विजय झाला. प्रभाग क्रमांक 22 ड मध्ये भाजपचे उमेदवार विवेक महादेव यादव यांचा ६२ मतांनी विजय झालाय.
मालेगाव महापालिकेत निवडून आलेले उमेदवार
मालेगाव महानगरपालिकेत कमी मतांनी निवडून आलेले उमेदवारांमध्ये एमआयएम पार्टीचे फिजा शेख नावीद एहरार २६ मतांनी विजय झाले आहेत. त्यांनी इस्लाम पार्टीच्या काशेफा सादिक यांनी पराभूत केलंय. प्रभाग क्रमांक ७ मध्ये समाजवादी पाटीच्या मुस्ताकीन यांनी मुस्तफा यांना ३० मतांनी पराभूत केलंय. प्रभाग क्रमांक ७ ब मध्ये समाजवादी पार्टीचे रुकसाना नूर मोहम्मद ५७ मतांनी विजयी झाले आहेत, त्यांनी एमआयएम च्या राबिया हुसेन यांना पराभूत केलं आहे.
चंद्रपूर महापालिकेतील निकाल महत्त्वपूर्ण ठरले
चंद्रपूर महापालिका निवडणूकीत काही निकाल महत्त्वपूर्ण ठरले आहेत. इथे प्रभाग क्रमांक २ मील ६ मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार डिलन केळझरकर यांचा ६३ मतांनी विजय झालाय. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विद्या ठाकरे यांचा पराभव केलाय. प्रभाग क्रमांक ४ ब मध्ये काँग्रेसच्या उमेदवार संगीता भोयर यांचा ३४ मतांनी विजय झालाय. त्यांनी मनसेच्या सचिन भोयर यांचा पराभव केलाय. प्रभाग क्रमांक ५ ड मध्ये काँग्रेसचे अभिषेक डोईफोडे यांचा २३ मतांनी विजय झालाय. त्यांनी भाजपच्या संदिप आवारी यांचा पराभव केलाय. प्रभाग क्रमांक १३ अ मध्ये काँग्रेसचे उमेदवार विनोद लभाणे यांचा २२ मतांनी विजय झालाय. तर वंचित बहुजम आघाडीच्या स्नेहल रामटेके यांचा पराभव झालाय.
जालन्यात प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपच्या सकूबाई पानबिसरे यांचा ८० मतांनी विजय झालाय, तर काँग्रेसच्या उमेदवार अस्माबी खान यांचा पराभव झालाय. प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपच्या स्वाती जाधव यांचा ३८ मतांनी विजय झालय, तर काँग्रेसच्या उमेदवार रुबीना पठान या पराभूत झाल्या आहेत.










