पटना – 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे. बिहारमधील 243 जागांपैकी 240 जागांवर सहमती झाली आहे. परंतु जेडीयू, भाजपा आणि एलजेपी यांच्यात तीन जागांवर वाटाघाटी सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड 101 जागा, भारतीय जनता पक्ष 100, चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) 26, जीतन राम मांझी यांचा हिंदुस्थान अवाम मोर्चा 7 आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा 6 जागा लढवतील. बैठकीत भाजपा त्यांचे सर्व प्रमुख उमेदवार उभे करेल असाही निर्णय घेण्यात आला. सम्राट चौधरी, शाहनवाज हुसेन आणि आरोग्यमंत्री मंगल पांडे हे देखील निवडणूक लढवतील.
आज रात्री जागावाटप जाहीर होण्याची शक्यता – एनडीए आघाडीची बैठक झाली असून आज रात्रीपर्यंत जागावाटपाचा फॉर्म्युला अधिकृतपणे जाहीर केला जाऊ शकतो. त्यानंतर, सर्व पक्ष त्यांच्या उमेदवारांची नावं जाहीर करतील. बिहारमध्ये नामांकनाचा पहिला टप्पा 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याआधी, सर्व पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची नावं जाहीर करावीत आणि उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागतील.
दोन टप्प्यात होणारी विधानसभा निवडणूक – बिहारच्या विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिला टप्पा 6 नोव्हेंबर रोजी आणि दुसरा टप्पा 11 नोव्हेंबर रोजी आहे. सर्व 243 विधानसभा जागांचे निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर 2025 रोजी संपत आहे.
2020 मधील एनडीएची कामगिरी – 2020 च्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान एनडीए आघाडीचा भाग नव्हते. यामुळं जेडीयूला तोटा झाला. या निवडणुकीत भाजपानं एकट्यानं 74 जागा जिंकल्या, तर जेडीयूनं 43 जागा जिंकल्या. व्हीआयपी आणि एचएएमनं प्रत्येकी चार जागा जिंकल्या. एनडीए आघाडीनं एकूण 125 जागा जिंकल्या. बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा 122 आहे. या परिस्थितीत, एनडीएनं बहुमताच्या आकड्यापेक्षा फक्त तीन जागा जास्त मिळवल्या होत्या.