Pune Pawar alliance impact on Thackeray Sena : अजित पवार यांचे नेते देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी आहेत. जर पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर, महायुतीमध्ये अजित पवार यांना राहण्याचा अधिकार नाही. मुंबईत काँग्रेस सोबत येणार का? या चर्चेला जवळपास पूर्णविराम लागला आहे. मात्र काँग्रेस मुंबई सोडून इतर काही ठिकाणी सोबत येईल. तशी आमची चर्चा सुरू आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
मी सकाळी सांगितलं शिवसेना आणि मनसे मुंबई आणि इतर महापालिका निवडणुकीत युती होत आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. उद्या १२ वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे माध्यमांशी संवाद साधतील आणि युतीची घोषणा करतील. काल रात्री जागावाटप संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आम्ही जी चर्चा करत आहोत ती मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली. मीरा-भाईंदर , नाशिक आणि पुणे या महापालिकांच्या युतीची करत आहोत. शरद पवार यांची NCP आमच्यासोबत संपर्क करत आहे, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
हेही वाचा – दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार! २६ तारखेला अजित पवार अधिकृत घोषणा करणार..
पुण्यात शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार
जेव्हा आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करू तेव्हा शरद पवार हे आमचे मार्गदर्शक असतील. अजित पवार जातीयवादी लोकांबरोबर काम करत आहेl. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर अजित पवार यांना महायुती मध्ये राहण्याचा अधिकार नाही. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही. पुणे महापालिकेत शिवसेना आणि मनसे एकत्र निवडणूक एकत्र लढणार आहे. नाशिक आणि पुण्यात काँग्रेससोबत जाण्याबाबत चर्चा सुरू आहे. मी स्वत: शरद पवार यांच्याशी चर्चा करत आहे.
“…तर आम्ही शरद पवार यांच्यासोबत जाणार नाही” – संजय राऊत
पुण्यात जर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतील तर आम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत पुण्यात जाणार नाही. मनसे आणि आम्ही निवडणूक लढवू काँग्रेस सोबत सुद्धा आमच्या सोबत पुण्यात येईल, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती शिवसेना नेत संजय राऊत यांनी माध्यमांना दिली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत चर्चा सुरू आहे. जर ही चर्चा पूर्ण झाली तर शरद पवार यांना सुद्धा उद्या पत्रकार परिषदेसाठी निमंत्रण दिलं जाईल. शरद पवार उद्या पुण्यात आहेत जर ते पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले तर आम्हाला आवडेल, असं खासदार संजय राऊत म्हणाले.












