Thackeray MPs Party Loyalty Oath : महाराष्ट्राच्या राजकारणातील खळबळजनक घडामोडी आणि ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली वज्रमुठ पुन्हा एकदा घट्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याच्या वावड्या उठवल्या जात होत्या. मात्र, या सर्व वावड्या सुरू असतानाच, खुद्द मातोश्रीवर खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची आणि भावनिक बैठक पार पडली. या बैठकीत केवळ राजकीय चर्चाच झाली नाही, तर सर्व खासदारांनी आपल्या आराध्य देवतेसमोर नतमस्तक होत निष्ठेचा पुनरुच्चार केला. असा दावा संजय राऊतांनी केलाय.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट हे जाणीवपूर्वक अफवांचे पीक पेरून शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचे खासदार फुटणार नाहीत, उलट आम्ही आता विरोधकांसाठी ऑपरेशन लांडगा सुरू करू, असा सणसणीत इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. राऊत यांच्या मते, विरोधकांकडे सांगण्यासारखे काहीही काम उरलेले नसल्याने ते अशा पद्धतीचे कपट कारस्थान रचत आहेत. मात्र, ठाकरेंची शिवसेना ही वाघांची संघटना आहे आणि वाघ कधीही कोणासमोर झुकत नाहीत, हे त्यांनी ठणकावून सांगितले.
सर्व खासदारांनी कुलदैवत आई तुळजाभवानीची घेतली शपथ
या बैठकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे खासदारांनी घेतलेली शपथ. मातोश्रीवर उपस्थित असलेल्या आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडल्या गेलेल्या सर्व खासदारांनी कुलदैवत आई तुळजाभवानीची शपथ घेऊन आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. राजकारणात अनेकदा फोडाफोडीचे राजकारण पाहिले जाते, परंतु अशा प्रकारे देवासमोर शपथ घेऊन आपली निष्ठा सिद्ध करण्याची ही घटना अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे. खासदारांनी ही शपथ केवळ एका व्यक्तीसाठी नाही, तर शिवसेनेच्या विचारांसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आपल्याच खासदारांवर विश्वास नाही, त्यांनाच शपथा घ्याव्या लागतात
राजकीय विश्लेषकांच्या मते, या बैठकीद्वारे उद्धव ठाकरे यांनी आपल्या विरोधकांना मोठा संदेश दिला आहे. पक्षाचे खासदार एकसंध राहणे हे ठाकरे गटासाठी अत्यंत गरजेचे आहे. विरोधक कितीही प्रयत्न करत असले तरी, निष्ठावान शिवसैनिक आणि नेते पक्षाशी जोडलेले आहेत, हे या बैठकीतून अधोरेखित झाले. दुसरीकडे, शिंदे गटाने यावर टीका करत म्हटले की, ज्यांना आपल्याच खासदारांवर विश्वास नाही, त्यांनाच अशा शपथा घ्याव्या लागतात. मात्र, राऊत यांनी या टीकेला उत्तर देताना सांगितले की, ही शपथ अविश्वासातून नाही, तर विश्वासाला बळकटी देण्यासाठी आहे.
कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये – उद्धव ठाकरे
ऑपरेशन टायगरच्या फोल ठरलेल्या चर्चा आणि खासदारांची आई भवानीची शपथ यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. संजय राऊत यांनी दिलेला ऑपरेशन लांडगा’ हा इशारा येणाऱ्या काळात नेमका काय रंग आणतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्या तरी उद्धव ठाकरे यांनी आपली खासदार फळी सुरक्षित ठेवून विरोधकांचा डाव उधळून लावला आहे, असेच चित्र दिसत आहे. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि पक्षाच्या कामाला लागावे, असा आदेश खुद्द उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिला आहे.












